आघाडीत बिघाडी होणार? जागा वाटपावरून काँग्रेस आक्रमक; ठाकरे गटाच्या जागांवर केला दावा

Maha Vikas Aghadi | Congress | Thackeray Group – लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा पैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. त्यातील एक जागा तर फक्त 48 मतांनी मविआने गमाविली. लोकसभेतील या यशानंतर आता विधानसभेच्या तयारीला महाविकास आघाडी लागली आहे.
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्या पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची रणनिती काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट केली आहे. काँग्रेस जागा वाटपात आक्रमक झाली आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्याही काही जागांवर दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या. तर शिवसेना ठाकरे गटाचे तीन खासदार निवडून आले. मुंबईत काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी वर्षा गायकवाड या आग्रही आहेत. काँग्रेसकडे मुंबईतून निवडणूक लढण्यास मोठ्या प्रमाणात इच्छुक आहे.
36 जागांसाठी जवळपास 200 अर्ज काँग्रेसकडे आले आहेत. त्यानुसार काँग्रेसने मुंबईत 15 ते 18 जागा मिळाव्यात असा आग्रह धरला आहे. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसने मुंबईतून चार जागा जिंकलेल्या आहेत. यातील झिशान सिद्धीकी हे अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत.
मुंबईतील 36 जागांवर काँग्रेसने सर्व्हे केला आहे. त्यानुसार 15 ते 18 जागा लढाव्यात अशी पक्षाची भूमिका आहेत. त्यातील काही मतदारसंघ हे ठाकरे गटाच्या ताब्यात आहेत. यात मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, चांदिवली, कुर्ला, माहीम, भायखळा हे मतदारसंघ काँग्रेसला द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे. हे मतदारसंघ ठाकरे गटाने सोडावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
चांदीवली हा मतदार संघ काँग्रेस नेते नसिम खान यांचा आहे. मागिल निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. यावेळी तिथले विद्यमान आमदार दिलीप लांडे हे शिवसेना सोडून शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे काँग्रेसने या मतदार संघावर दावा केला आहे.
भायखळा मतदारसंघासाठी ही काँग्रेस आग्रही आहे. त्यासाठी एखादा मतदारसंघ सोडण्याची काँग्रेसची तयारीही आहे. मुंबई हा शिवसेनेचा गड राहिला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे 13 आमदार निवडून आले होते. सध्या ठाकरेंकडे मुंबईतीले 5 आमदार आहेत. मात्र या जागा लढवण्यात ठाकरे गट ठाम आहे.





