Anjali Ambedkar: “… तेव्हा त्यांना भाजपची बी-टीम का म्हटले जात नाही”; डिलिमिटेशनवरुन शरद पवार-सुप्रिया सुळेंवर अंजली आंबेडकरांचा निशाणा
Anjali Ambedkar: 'उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोच्या लोकांनी मौन का बाळगले आहे?'

Anjali Ambedkar: शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेणाऱ्या आणि भारताच्या लोकशाही व संघराज्यीय पायाभूत रचनेला कमकुवत करणाऱ्या राजकीय प्रक्रियेला मदत करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी आणि वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी केला आहे.
फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत, भाजपने प्रस्तावित केलेले डिलिमिटेशन विधेयक हे एसआयआर पेक्षाही अधिक धोकादायक आहे. या डिलिमिटेशन विधेयकामुळे उत्तर भारतातील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व असमान प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या संघराज्यीय समतोलाला मूलभूत धक्का बसू शकतो.
एका विशिष्ट प्रादेशिक गटाच्या हातात राजकीय सत्ता केंद्रित होऊ शकते आणि संघराज्य व्यवस्थेतील समान प्रतिनिधित्वाच्या लोकशाही तत्त्वाला बाधा पोहोचू शकते. हा काही केवळ संसदेतील तांत्रिक प्रक्रियेचा विषय नाही. हा भारताच्या लोकशाहीच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे, असे अंजली आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
किती लोकांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भाजपची बी-टीम म्हटले?
शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेणाऱ्या आणि भारताच्या लोकशाही व संघराज्यीय पायाभूत रचनेला कमकुवत करणाऱ्या राजकीय प्रक्रियेला मदत करत आहेत, ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. मात्र, प्रश्न असा आहे की उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोच्या लोकांनी मौन का बाळगले आहे?
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या अलीकडील निर्णयावर टीका करणारे खुले पत्र किती स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी लिहिले? निर्भय बनोच्या किती लोकांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भाजपची बी-टीम म्हटले? असा सवालही अंजली यांनी विचारले.
वंचितला भाजपची बी-टीम ठरवणाऱ्या किती लोकांनी….
शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात. मात्र, त्यांना भाजपची बी-टीम म्हटले जात नाही. जेव्हा ते उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात तेव्हा अचानक त्यांचे आवाज बंद होतात. वंचितला भाजपची बी-टीम ठरवणाऱ्या किती लोकांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भाजपची बी-टीम म्हटले, असा सवाल अंजली आंबेडकर यांनी उपस्थित केला.
वंचित बहुजन आघाडी केवळ स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून ती आपोआप भाजपची बी-टीम ठरते, मग शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या राजकीय अजेंड्याला मदत करतात आणि त्याला वैधता मिळवून देतात, तेव्हा त्यांना भाजपची बी-टीम का म्हटले जात नाही? तुमचे हे मौन तुमचा संताप हा केवळ राजकीय सोय आणि जातीवर आधारित आहे.
यातून तुमचा बौद्धिक अप्रामाणिकपणा आणि बहुजन राजकीय पक्षांविषयी असलेला द्वेष उघड होतो. तुम्ही सर्वजण विकले गेलेले आहात असे भाजपला पोटतिडीकोने विरोध करणाऱ्या फुले आंबेडकरी कार्यकर्त्यांनी गृहीत धरावे का? असेही अंजली आंबेडकर यांनी विचारले आहे.
हेही वाचा:





