King Film: ‘किंग’ चित्रपटात दिसणार राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चनची जोडी?
King Film: तब्बल २० वर्षांनंतर एकत्र दिसणार

King Film: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘किंग’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याचदरम्यान आता या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे.
अभिनेत्री राणी मुखर्जीही या सिनेमाचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे. राणी आणि अभिषेक बच्चनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यानंतर दोघे या चित्रपटानिमित्त एकत्र दिसणार असल्याची चर्चा होत आहे.
व्हायरल फोटो हा राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्या आगामी ‘किंग’मधला असल्याची चर्चा आहे. काहींनी हा एआय फोटो असल्याचाही अंदाज लावला आहे. ‘किंग’मध्ये अभिषेक आणि राणीचा एकत्र सीन असेल का यावर अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. (King Film)
राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन ही जोडी ‘बंटी और बबली’मुळे लोकप्रिय झाली. याशिवाय त्यांनी ‘कभी अलविदा ना कहना’,’लागा चुनरी मे दाग’,’युवा’ अशा काही सिनेमांमध्ये काम केले आहे.
राणी मुखर्जी ‘किंग’मध्ये अभिषेकच्या विरुद्ध भूमिकेत दिसेल. अभिषेक या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘किंग’च्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार मोठ्या पडद्यावर तब्बल २० वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. त्यांनी शेवटचे २००७ मध्ये आलेल्या ‘लागा चुनरी में दाग’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. (King Film)
तसेच शाहरूख खानसोबत ती शेवटची २००६ च्या ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात दिसली होती. मात्र, राणी मुखर्जीच्या या एंट्रीबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या बातम्या खऱ्या ठरल्या, तर चाहत्यांना दोन दशकांनंतर अभिषेक आणि राणीला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहता येईल. राणीच्या भूमिकेबद्दलही गुप्तता पाळण्यात आली आहे. (King Film)
‘किंग’मध्ये शाहरूख खान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खान देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अभय वर्मा आणि दीपिका पदुकोण इत्यादी कलाकारही आहेत. याचे दिग्दर्शन ‘पठाण’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी जगभरात रिलीज होणार आहे. (King Film)
हेही वाचा:
Pune District : दबा धरून बसलेल्या बिबट्याचा दोन महिलांवर हल्ला; शिरूर तालुक्यातील घटना






