Varun Dhawan: हातात कुदळ अन् अंगाला चिखल! वरुण धवन थेट शेतात उतरला; म्हणाला, “शेतीला सुरुवात…”
Varun Dhawan वरुणने १९ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शेतजमीन खरेदी केल्याची माहिती दिली होती. ही जमीन खरेदी करणे ही त्याच्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी असल्याचे त्याने म्हटले होते. त्याच्या या निर्णयानंतर चाहत्यांसोबतच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनीही त्याचे अभिनंदन केले होते.

Varun Dhawan: अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या नव्या सिनेमामुळे नव्हे, तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. वरुणने काही दिवसांपूर्वी शेतजमीन खरेदी केली होती. आता त्याने या शेतात प्रत्यक्ष काम करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हातात कुदळ घेऊन आणि चिखलात काम करताना दिसणाऱ्या वरुणचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
वरुणने १९ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शेतजमीन खरेदी केल्याची माहिती दिली होती. ही जमीन खरेदी करणे ही त्याच्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी असल्याचे त्याने म्हटले होते. त्याच्या या निर्णयानंतर चाहत्यांसोबतच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनीही त्याचे अभिनंदन केले होते.
शेतात काम करताना दिसला वरुण
आता वरुणने आपल्या शेतातील काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो अगदी साध्या अंदाजात दिसत आहे. पांढरे कपडे घातलेला वरुण शेतात प्रत्यक्ष काम करताना दिसतोय. एका फोटोमध्ये त्याच्या कपड्यांवर आणि हातांवर चिखल लागलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने खांद्यावर कुदळ घेतली आहे.
वरुणच्या चेहऱ्यावर या सगळ्यादरम्यान एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. स्टारडमपासून दूर जाऊन मातीशी जोडलेला हा वरुणचा साधा अंदाज चाहत्यांना विशेष आवडला आहे. या फोटोसोबत वरुणने “शेतीला सुरुवात” अस कॅप्शन दिल आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही वरुणच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्याचे कौतुक केले. त्याच्या फिटनेस ट्रेनर प्रशांत सावंतनेही ‘Superb’ अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
View this post on Instagram
शेतात चहा-बिस्किटांचा आनंद
वरुणने आपल्या शेतातून एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो अगदी निवांतपणे चहा आणि बिस्किटांचा आनंद घेताना दिसत आहे. या व्हिडीओमधून त्याला शेतातील शांत आणि निवांत वातावरण किती आवडत आहे, हे दिसून येते.
शेतजमीन खरेदी केल्यानंतर वरुणने चाहत्यांशी संवाद साधताना यामागची कल्पना सांगितली होती. शेत का घेतले, असा प्रश्न मला विचारू नका, असे त्याने मजेशीरपणे म्हटले होते. मात्र, शेतातील वातावरणात बसून चहा आणि बिस्किटांचा आनंद घेणे आपल्यासाठी खूप खास असल्याचे त्याने सांगितले होते.
अभिनयासोबत शेतीकडेही लक्ष
वरुण धवन हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बदलापूर’, ‘ऑक्टोबर’, ‘भेडिया’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी तो ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर, पूजा हेगडे आणि मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, आता वरुणच्या शेतातील फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारणारा वरुण आता प्रत्यक्ष शेतात उतरून मातीशी जोडला गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या नव्या छंदाबद्दल चाहतेही उत्सुक आहेत.





