Pune District : दबा धरून बसलेल्या बिबट्याचा दोन महिलांवर हल्ला; शिरूर तालुक्यातील घटना
Pune District : स्थानिक ग्रामस्थांनाही या ठिकाणी वारंवार बिबट्याचे दर्शन झाले असून नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहेत मात्र बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही.

जांबूत वार्ताहर : शिरूरच्या बेट भागातील बिबट प्रवण क्षेत्र अतिसंवेदनशिल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरखेड-भागडी रस्त्यावर बऱ्हाटेवस्ती परिसरात रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन महिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी ( दि.६) रात्री सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे दुचाकीस्वार महिला प्रचंड भयभीत झाल्या. प्रसंगावधान राखून दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न करताना दुचाकी घसरल्याने स्नेहा भोजणे ही तरूणीच्या पायाला दुखापत होऊन ती जखमी झाली.
भागडी (ता.आंबेगाव) येथील सुषमा भास्कर उंडे व स्नेहा सुनील भोजणे या दोघी दुचाकीवरून पिंपरखेडच्या दिशेने जात असताना बऱ्हाटे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतातून अचानक बिबट्या बाहेर आला. त्याने दुचाकीच्या दिशेने झेप घेत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.अचानक समोर आलेल्या बिबट्यामुळे दोघीही भयभीत झाल्या मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकी घसरल्याने स्नेहा भोजणे यांना दुखापत झाली.
जखमी स्नेहा सुनील भोजणे यांच्यावर पिंपरखेड येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले असून घटनास्थळी दोन बिबट्या दिसून आल्याचे सुषमा उंडे यांनी सांगितले. स्थानिक ग्रामस्थांनाही या ठिकाणी वारंवार बिबट्याचे दर्शन झाले असून नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहेत मात्र बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही.
पिंपरखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यालगत असलेल्या ऊसाच्या शेतांमध्ये बिबट्यांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुचाकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा बिबट्या भविष्यात नागरिकांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात तातडीने पाहणी करावी, बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरे लावावेत तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.





