विधानपरिषद निवडणुक बिनविरोध होणार? 6 पैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद

Vidhan Parishad Election 2025 | विधानपरिषदेच्या रिक्त पाच जागांच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. 17 मार्च रोजी शेवटच्या दिवशी एकूण सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजपने रविवारी आपले तीन उमेदवार जाहीर केले. तर अजित पवार गटाने सोमवारी पक्षाचे सरचिटणीस संजय खोडके आणि शिंदेसेनेने नंदुरबारचे चंद्रकांत रघुवंशी यांची उमेदवारी जाहीर केली होती.
विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरलेल्यांमध्ये भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे, संजय खोडके आणि चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश आहे. तर पुणे जिल्ह्यातील दौंड येथील उमेश म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवाराने भरलेला अर्ज बाद ठरला आहे.
म्हात्रे यांनी भरलेल्या अर्जासोबत अनुमोदक आणि सूचक म्हणून एकाही आमदाराची स्वाक्षरी नसल्याने तो अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. तर 20 मार्चपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.
दरम्यान, सोमवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत खोडके यांनी व शिंदेसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रघुवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
विधानसभा निवडणुकीत प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडळकर, आमश्या पाडवी, राजेश विटेकर हे विधान परिषदेचे आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या पाच जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
हेही वाचा:





