Hinjewadi Metro : हिंजवडी मेट्रोचा मुहूर्त टळणार? पंतप्रधानांचा दौरा पुढे ढकलल्याने उद्घाटन लांबणीवर
Hinjewadi Metro उद्घाटनाची अधिकृत तारीख अद्याप निश्चित नाही

पुणे – हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३ नोव्हेंबर रोजी बारामती नियोजित दौरा होता. हा दौरा पुढे ढकलला जाण्याची चर्चा आहे. तसे झाल्यास हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या उद्धाटनाचा मुहूर्त पुन्हा टळणार असून, उद्घाटनाची अधिकृत तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
हिंजवडीतील आयटी क्षेत्राला शिवाजीनगरशी जोडणारा २३.२ किलोमीटरचा हा उन्नत मेट्रो मार्ग सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारण्यात आला आहे. मार्गावरील १७ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, २० मेट्रो डबे उपलब्ध आहेत. सुमारे ९० चालकही सेवेसाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या दररोज दहाहून अधिक चाचणी फेऱ्या सुरू असून, गाड्यांची वेळ, स्थानकांवरील थांबे आणि प्रवासाचा कालावधी तपासला जात आहे. मात्र, प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सुरक्षा मंजुरी आणि कार्यान्वयनाची तयारी पूर्ण होणे गरजेचे आहे. मेट्रो सुरू झाल्यास हिंजवडी आणि शिवाजीनगरदरम्यान प्रवास करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांचा वेळ वाचण्यासह वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्यात मेट्रोचे उद्घाटन होण्याची अपेक्षा होती. नवीन तारीख आल्याबाबत चर्चा असली, तर त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर न झाल्याने हिंजवडी मेट्रोला मुहूर्त मिळणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
Satara: सातारा पालिकेची कर वसुली 36 टक्क्यांवर; दीडशे दिवसांत 100 टक्क्यांचे आव्हान!





