Satara News : नवजा गावातील रामबाण दगड परिसर विकासाला चालना मिळणार का?

कोयनानगर : कोयनानगरच्या पश्चिमेकडील डोंगररांगेत वसलेल्या नवजा गावाजवळील ‘रामबाण दगड’ हे ठिकाण श्रद्धा, गूढता आणि ऐतिहासिकतेच्या अनोख्या संगमाने प्रसिद्ध आहे. लोकश्रुतीनुसार प्रभू श्रीराम वनवास काळात या ठिकाणी थांबले होते आणि त्यांनी आपल्या बाणाचा स्पर्श या दगडाला केला होता. त्या बाणस्पर्शामुळे या दगडाला पवित्रतेचा दर्जा प्राप्त झाला असून, आजही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.
या ठिकाणी पोहोचण्यासाठी अद्यापही पायवाटच एकमेव मार्ग आहे. डोंगराळ, उंचसखल भागातून जाणारी ही पायवाट खाचखळग्यांनी भरलेली आहे. विशेषतः पावसाळ्यात ही वाट अधिकच कठीण होते. मात्र, या साऱ्या अडथळ्यांना न जुमानता दरवर्षी अनेक भाविक या ठिकाणी येतात. श्रावण महिन्यात तर भक्तांची संख्या अधिक असते. ही पायवाट दुरुस्त करून येथे मंदिर उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे.
‘रामबाण दगड’बाबत एक विशिष्ट आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जर कोणी या परिसरात मांसाहार करून गेला, तर तेथील पाण्याचा झरा आटतो. या घटनेचा अनुभव अनेकांनी घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिक नव्हे तर गूढतेच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते. या श्रद्धेचा आणि गूढतेचा संगम पाहता या ठिकाणी धार्मिक पर्यटनाला चालना मिळू शकते.
ग्रामस्थांच्या मते, या ठिकाणाचा विकास झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. भाविकांसाठी योग्य सुविधा निर्माण करून या परिसरात धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन विकसित करता येईल. त्यातून गावाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होऊ शकतो. पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई हे सध्या राज्य मंत्रिमंडळात पर्यटन खात्याचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे या ठिकाणाच्या विकासासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
स्थानिक प्रशासन, वनविभाग आणि पर्यटन खात्याकडे ग्रामस्थांनी या संदर्भात अधिकृत प्रस्ताव दिले आहेत. शासनाच्या धार्मिक पर्यटन विकास योजनेतून या प्रकल्पाला निधी मिळावा, रस्ते व पायाभूत सुविधा उभाराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. शासनाने सकारात्मक पावले उचलल्यास नवजा गावाला ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन नकाशावर ठळक स्थान प्राप्त होऊ शकते. त्यामुळे ‘रामबाण दगड’चे पावित्र्य आणि त्याचा ऐतिहासिक वारसा उजळून निघेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.





