Satara: बनावट स्क्रीनशॉटद्वारे फसविणाऱ्यास अटक; सातारा शहर पोलिसांकडून १२ गुन्ह्यांची उकल, साडेतेवीस लाखांचा मुद्देमाल जप्त
Satara पोवई नाका येथील एस. एस. मोबाइल शॉपमधून २७ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एका व्यक्तीने सॅमसंग फोल्ड ७ मोबाइल खरेदी केला. मोबाइलचे ऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट एनईफटी स्क्रीनशॉट दाखवून तो मोबाइल घेऊन पसार झाला.

Satara: बँक एनईएफटी व्यवहाराचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या आदित्य विनोद गायकवाड (वय 22, रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे) या सराईत संशयिताला अवघ्या १२ तासांत अटक करत सातारा शहर पोलिसांच्या डी. बी. पथकाने १२ गुन्ह्यांची उकल केली आहे. संशयितांकडून सोने, महाग मोबाइल, टीव्ही, एसी, कार असा एकूण २३ लाख ४५ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोवई नाका येथील एस. एस. मोबाइल शॉपमधून २७ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एका व्यक्तीने सॅमसंग फोल्ड ७ मोबाइल खरेदी केला. मोबाइलचे ऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट एनईफटी स्क्रीनशॉट दाखवून तो मोबाइल घेऊन पसार झाला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपअधीक्षक विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डी. बी. पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यातील १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग फोल्ड ७ मोबाइल जप्त करण्यात आला.
संशयिताने चौकशीत सातारा, सांगली, पुणे, रायगड तसेच गोवा येथेही बनावट एनईएफटी स्क्रीनशॉट दाखवून सोने, महाग मोबाईल आणि इतर वस्तूंची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यानुसार शाहूपुरी (सातारा), कासेगाव (सांगली), तळेगाव एमआयडीसी, हिंजवडी, आळेफाटा, खोपोली आणि मडगाव (गोवा) येथील एकूण १२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. संशयिताकडून सोने, महाग मोबाइल, टीव्ही, एसी, गुन्ह्यात वापरलेली कार व मोबाइल असा एकूण २३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशाच प्रकारे बनावट एनईएफटी स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी सातारा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.





