पुणे जिल्हा | पवार राजकीय गुगली टाकणार का?

इंदापूर, {नीलकंठ मोहिते}- इंदापूर तालुक्यात आजपर्यंतच्या इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा परिवर्तन घडवणारी ठरलेली आहे. हा इतिहास जनतेला माहिती आहे. आजी-माजी आमदारांना शरद पवारांच्या एका सभेनेच पद दिले होते;
मात्र दोन्हीही आजी- माजी आमदार शरद पवार यांच्या विचारांचे आजच्या स्थितीला राहिलेले नाहीत. त्यामुळे इंदापूर तालुक्याचे राजकीय गुरू म्हणून जनतेची मान्यता मिळवणारे शरद पवार शनिवार (दि. 23)च्या शेतकरी मेळाव्यात राजकीय गुगली टाकून चमत्कार घडवणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
मध्यतरीच्या काळात राजकीय उलथापालथी झाल्या. त्यातच पवारांचे राजकीय वारसदार म्हणून ज्यांच्याकडे बघितले जात होते ते अजित पवार यांनी पवारांचा हात सोडून शिवसेना (शिंदे गट) भाजपच्या सत्तेत सहभागी होत, शरद पवार यांनी उभा केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह घड्याळ हेही मिळवले. यानंतर बरेच पाणी पुलाखालून गेले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष (शरद पवार, अजित पवार) झाल्यावर शरद पवार पहिल्यांदाच इंदापूरच्या दौर्यावर येत आहेत.
इंदापूर तालुक्यात कोणताही राजकीय बदल करायचा असेल तर तो बदल शरद पवारांनी मतदारांना आपल्या सभेतून सुचवला तर येथील जनता कित्येक वर्षांपासून ऐकत आले आहे. आजही पवार काय बोलणार याकडे सामान्य जनता टक लावून बसलेली आहे. मागील महिन्यापासूनच खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकसभेचा प्रचार तालुक्यातील घरापर्यंत पोहोचलेला आहे, त्यामुळे या सभेत शरद पवार कोणाला टार्गेट करणार की भावनात्मक भाष्याने जनतेला आपले करणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
प्रवीण मानेंना मिळणार का गिफ्ट?
सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने वगळता एकही मोठा दिग्गज नेता शरद पवारांच्या सद्यस्थितीला विचाराचा राहिलेला दिसत नाही; मात्र प्रत्येक गावात नव्या कार्यकर्त्यांना संधी देत, गावोगावी तुतारीचा निनाद करण्यामध्ये शरद पवार यशस्वी ठरले आहेत.
इंदापूर तालुक्यातील एखाद्या नव्या नेत्याला राजकीय क्षितिजावर मोठ्या प्रमाणात आणण्याची किमया आजपर्यंत शरद पवारच करतात. त्यामुळे पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या सोनाई परिवाराच्या माने कुटुंबीयांना आगामी काळात शरद पवार राजकीय कोणते गिफ्ट देणार, याकडे देखील लक्ष लागले आहे.
अन् खासादार सुळेंनी चालवला वेगळा बाण
शरद पवारांची सभा व्हावी, सभा होऊ नये यासाठी मागील विधानसभा निवडणुकीपर्यंत मोठे नेते आपले देव पाण्यात घालून बसले होते. असे असले तरी देखील अजित पवार शरद पवारांपासून दुरावल्यावर शरद पवारांनी घेतलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या पहिल्या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रण देऊन पवारांनी मोठी खेळीच केली.
तर अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांकडून इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटलांवर केलेल्या टीकेचा समाचार हर्षवर्धन पाटलांची बाजू घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी वेगळाच राजकीय बाण चालवला आहे.
हर्षवर्धन पाटलांना लावणार का गळाला?
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आम्हाला जे विधानसभेला मदत करण्याची ठोस भूमिका घेतील त्यांनाच लोकसभेला मदत करू. आमच्या पाठीत राजकीय खंजीर खुपसला. असे भाष्य केल्यामुळे शरद पवार गटाकडून आगामी राजकीय खेळी म्हणून हर्षवर्धन पाटलांना गळाला लावत लोकसभा निवडणुकीचा आखाडा गाजवणार का, की पटलांचा छुपा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी होतात, हे निवडणुकीच्या निकाला नंतर स्पष्ट होणार हे मात्र नक्की!





