Pankaja Munde – महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
अशात महाराष्ट्रातून शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप या पक्षातील कोणते सहा नेते उमेदवारी साठी पुढे येतील याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. महाराष्ट्रातील सहा जागांचे चित्र कसे असेल? असा प्रश्नही सध्या चर्चेत आला आहे. यादरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर आता भाजप कडून पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होत आहे. या चर्चांवर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,’पंकजा मुंडे आणि माझी संघटनेच्या विषयानिमित्त नेहमीच भेट होत असते. पण आमच्या भेटीत राज्यसभेच्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. राज्यसभेत कोण जाणार? याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेत असतात. पंकजा मुंडे या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचे की आणखी कोणते पद द्यायचे हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकांसाठी आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. दिनांक 15 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून 16 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार. 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. 29 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.
निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानासाठी विशेषत- जांभळ्या रंगाची स्केच पेन वापरण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचे तसेच, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबतचेही त्यांच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.