परीक्षेला बसू देणार नाही.! कॉन्व्हेंट शाळेत होळीला रंग आणण्यास नकार, शिक्षकांचा गंभीर इशारा

Holi 2025 – होळीच्या वेळी विद्यार्थ्यांना रंग आणि गुलाल आणण्यास नकार दिल्याने राजधानी जयपूरमधील एका कॉन्व्हेंट शाळेत वाद निर्माण झाला. शाळा प्रशासनाने पालकांना संदेश पाठवून विद्यार्थ्यांना रंग आणू नका, असे आवाहन केले आणि जर कोणताही विद्यार्थी रंग आणला तर त्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असा इशारा दिला.
राज्याचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे आणि शाळेवर कारवाईची मागणी केली आहे. दिलावर यांनी या आदेशाला धार्मिक आदेश म्हटले आहे.
याप्रकरणी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे तक्रार दाखल केली जाईल. अशा शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. होळी हा एक पवित्र सण आहे आणि असे निर्बंध आपल्या श्रद्धेचा अपमान आहेत.
वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, शाळेच्या मुख्याध्यापिका सिंथिया यांनी स्पष्ट केले की त्यांचा संदेश चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे. १२ मार्च रोजी शाळेत विद्यार्थ्यांसोबत होळी साजरी केली जाईल, परंतु पारंपारिक रंगांऐवजी फुले आणि पर्यावरणपूरक रंगांचा वापर केला जाईल. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि परीक्षेची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र ही केवळ सारवासारव असल्याचे नंतर स्पष्ट झाले. शाळेच्या या निर्णयावर अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी, शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर आता या मुद्द्याला अधिक महत्त्व येऊ शकते. यावर सरकार काय कारवाई करते आणि शाळा प्रशासन आपल्या निर्णयात काही बदल करते का हे पाहणे रंजक ठरणार आहे.





