Modi Cabinet 2025 : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विस्तारामध्ये महाराष्ट्रातून शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रीय मंत्रिपदासाठी उत्सुक आहे, त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात यापैकी कोणत्या पक्षातील नेत्याची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर भाजपाचे दोन्ही मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याची इच्छा बाळगून आहेत. काहींच्या मते, मोदी ३.० सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार आणि त्यात फेरबदल होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या काही दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एक मंत्रिपद मिळू शकते. शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही एक मंत्रिपद दिले जाईल, असं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरु आहे.
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील किती मंत्री?
नितीन गडकरी (कॅबिनेट मंत्री), पियुष गोयल (कॅबिनेट मंत्री), रक्षा खडसे (राज्यमंत्री), मुरलीधर मोहोळ (राज्यमंत्री), शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव (स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री) यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही केंद्रात मंत्रिपद मिळण्याची इच्छा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत फक्त एकच जागा जिंकता आल्याने त्यांच्या पक्षाला मंत्रिपद नाकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळू शकतं, असा अंदाज वर्तवला जात आहे.