गोपाळ शेट्टी माघार घेणार का ? सागर बंगल्यावर फडणवीसांची भेटीनंतर प्रतिक्रिया समोर

Gopal Shetty | विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी नाकारल्याने अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यातीलच एक म्हणजे भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बोरिवली येथून पक्षाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने गोपळ शेट्टी नाराज आहेत. मात्र त्यांनी अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास चार नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेट्टींच्या नाराजीची गंभीर दखल घेत त्यांना बोलावून घेतलं. गोपाळ शेट्टी यांनी पाडव्याच्या दिवशी सकाळीच सागर बंगल्यावर दाखल झाले. यावेळी केंद्रीय नेतृत्वाच्या जवळचे असलेले विनोद तावडेही गोपाळ शेट्टी यांच्यासोबत होते.
दरम्यान, गोपाळ शेट्टी अपक्ष लढण्यावर ठाम आहे. याबाबत ते म्हणाले. “मी पहिल्या दिवसापासून सांगत आलोय की मी पक्ष सोडला नाही आणि सोडणारही नाही. पक्षाने काढलं तरी मी पक्ष सोडणार नाही. आजही मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मी जे काही काम करतोय ते पक्षहितासाठी करतोय. पक्षाला पक्षाचं काम करावं लागतं. पक्षहितासाठी जे करायचं आहे ते मी करणार,’ असे त्यांनी स्पष्ट केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत पियुष गोयल यांच्यासाठी पत्ता कापलेल्या गोपाळ शेट्टी यांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द त्यावेळीही देण्यात आला होता. मात्र विधानसभेला तिकीट मिळण्याच्या आशेवर असलेल्या शेट्टींना भाजपच्या तिसऱ्या यादीत धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं ठरवलं.





