कोल्हापूर : नगरपालिका व नगरपंचायती निवडणूकांचे क्षेत्र हे व्यापक प्रमाणात असल्याने, येथील स्थानिक नेत्यांना त्यापातळीवर युती करण्याचे अधिकार देण्यात आले होते. आता मात्र राज्यातील ३० महानगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत, या निवडणूका आम्ही महायुती म्हणून एकत्रित स्वरुपात लढणार आहोत. यासाठी लवकर शिंदेसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी इचलकरंजीमध्ये बोलताना दिली. आगामी महानगरपालिकांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगर भाजपची पदाधिकारी बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी निवडणूकीच्या अनुशंघाने चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, आजी-माजी आमदार, प्रमुख कार्यकर्ते आदी उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, इचलकरंजी महापालिका निवडणूकीच्या दृष्टीकोनातून भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. येथे इच्छूकांची संख्या जास्त असल्याने, मकरंद पाटील, प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे या चौघांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील सक्षम उमेदवार शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यातून गुणवत्तेच्या आधारे उमेदवाराची निवड करण्याचे अधिकार सुकाणू समितीकडे देण्यात आले असल्याचे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले. तयारीच्या कार्यकर्त्यांना सूचना बैठकीच्या सुरुवातीलाच चंद्रकांत पाटील यांनी सुकाणू समितीशी बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पाटील यांनी पक्ष संघटनेला निवडणूकीच्या तयारीची सुरुवात करण्याचे संकेत दिले. सक्षमांनाच उमेदवारी देणार असल्याचे सांगताना, त्यांनी दिलेल्या उमेदवारांना निवडूण आणन्याची जबाबदारी ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीच असणार आहे, ती जबाबदारी नेटकेपणे पार पाडावी, असे आवाहन देखील यावेळी मंत्री पाटील यांनी केले.