Digital Arrest Case : डिजिटल अरेस्टच्या भीतीने ज्येष्ठाची 10 कोटींची फसवणूक; आरोपीला अखेर जामीन
Digital Arrest Case : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ८२ वर्षीय ज्येष्ठाची १० कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हर्षद धंतोलेला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Digital Arrest Case : ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची १० काेटी ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी हर्षद धंतोले यास जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही, चौधरी इनामदार यांनी जामीन मंजूर केला. त्याने ॲड. अजित पवार आणि ॲड. प्रणित नामदे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
जानेवारी महिन्यात ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला आरोपींनी ‘सीबीआय’मधील अधिकारी असल्याची बतावणी केली होती. ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून त्यांच्याकडून १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपये उकळले. आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे भरण्यास सांगितले होते. तपासात हर्षद धंतोले हा या टोळीचा सदस्य असल्याची पुरावे प्राप्त झाले होते. त्याने फसवणूक करण्यासाठी वापरलेल्या बँक खात्यातून २९ गुन्ह्यांचा शोध लागला.
आंतराष्ट्रीय स्तरावरील हॅकर्सशी त्याचा संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र, आरोपी तर्फे युक्तिवाद करताना आरोपीचा डिजिटल अरेस्ट मध्ये सहभाग दिसून येत नाही तसेच आरोपीकडून तपासादरम्यान गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यात आलेली नाही. त्याला ह्या गुन्ह्यात नाहक गोवण्यात आलेलं आहे, असा युक्तिवाद ॲड. अजित पवार आणि ॲड. प्रणित नामदे यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने आरोपीला जामीन मंजुर केला.





