Pune Metro: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षित प्रवासासाठी पुणे मेट्रोकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. ८ पासून पुणे मेट्रोच्या सर्व गाड्यांमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुणे मेट्रोच्या प्रत्येक गाडीत तीन डबे असून तिन्ही डब्यांमध्ये ही आसन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांची सोय होणार आहे. या नव्या व्यवस्थेनुसार पहिल्या डब्यात महिलांसाठी १४ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २ जागा राखीव असतील. मधल्या डब्यात महिलांसाठी १८ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ जागा राखीव असतील. तिसऱ्या डब्यात महिलांसाठी १४ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २ जागा राखीव असतील. त्यामुळे प्रत्येक गाडीत महिलांसाठी एकूण ४६ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ जागा राखीव असणार आहेत. या आसन व्यवस्थेचा सविस्तर आराखडा सर्व मेट्रो स्थानकांवर तसेच अधिकृत ॲपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मेट्रोच्या डब्यांमध्ये दर्शवलेल्या चिन्हांनुसार राखीव जागा ओळखून त्यानुसार बसण्याची विनंती प्रवाशांना करण्यात आली आहे. या राखीव जागांच्या नियमांचे पालन करून सहप्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आले आहे.