बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ‘एनडीए’ची साथ सोडणार? कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी वर्तवली शक्यता

पाटणा –बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वारंवार एनडीएमध्ये राहणार असल्याचे सांगत आहेत. नितीश पुन्हा कुठंतरी जाणार असल्याचं त्यांच्या इतक्या वेळा स्पष्टीकरण देण्यातून वाटतयं, अशी राजकीय चर्चांना तोंड फोडणारी शक्यता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी वर्तवली.
लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांनी राष्ट्रीय स्तरावर एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. त्या आघाडीसाठी पुढाकार घेणाऱ्यांत नितीश अग्रभागी होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या गोटातून बाहेर पडून नितीश भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएत परतले. त्यानंतर ते सातत्याने एनडीएमध्येच राहण्याची ग्वाही देत आहेत.
विरोधकांबरोबर जाण्याची दोनवेळा केलेली चूक पुन्हा करणार नसल्याचे ते ठामपणे सांगत आहेत. त्यावर पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना सिंह यांनी मिश्कील टिप्पणी केली. आमच्या माहितीनुसार नितीश यांनी १४ वेळा स्पष्टीकरण दिले. गतकाळातील कृतीबद्दल एखाद्याने एकदा, दोनदा किंवा अगदी तीनदा स्पष्टीकरण देणे समजू शकतो. पण, इतक्या वेळा स्पष्टीकरण देण्याने संशयाला वाव मिळतो. त्यातून नितीश पुन्हा कुठला घूमजाव करणार आहेत का असा प्रश्न जनतेला पडला आहे, असे ते म्हणाले.





