अजित पवारांविरोधात निवडणूक लढवणार का? युगेंद्र पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

बारामती : सगळेच पक्ष आगामी विधानसभेच्या निवडणुकीला लागले आहेत. मागच्या लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला तर महाविकास आघाडीने मोठा विजय संपादन केला. या निवडणुकीत बारामतीची निवडणूक मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली. या निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव करत सुप्रिया सुळेंनी विजय संपादन केला होता.
यानंतर आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बारामती मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, यावर आता युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले युगेंद्र पवार?
बारामती विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, यावर बोलताना ते म्हणाले की, या मतदारसंघात उमेदवार कोण असणार याबाबत शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील. मात्र मी या मतदारसंघात अनेक दिवसांपासून सामाजिक कार्य करत आहे, इथल्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे. साहेबांसाठी लोकसभेला मी इथे प्रचार केला, एवढंच आहे. अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली.





