Sanjay Raut: बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? उद्धव ठाकरे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? संजय राऊतांनी केलं स्पष्ट
Sanjay Raut: महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार देण्याचा विचार केला जात आहे.

Sanjay Raut: राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील हालचालींना वेग आला आहे. महायुतीकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार देण्याचा विचार केला जात आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हंटले की, “बारामती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाली असली, तरी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडी एकसंध असून मित्रपक्षांशी संवाद साधूनच अंतिम उमेदवाराची घोषणा केली जाईल.”
आतापर्यंत पाठिंब्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही
संजय राऊत पुढे म्हणाले की, “सुनेत्रा पवार भारतीय जनता पक्षासोबत निवडणूक लढत आहेत. त्यांची युती भाजपसोबत आहे, याबाबत आमच्या पक्षात चर्चा झाली. त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार नाहीत.
त्यामुळे त्यांनी जरी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असली तरी देखील उद्धव ठाकरे निर्णय घेतील. आतापर्यंत पाठिंब्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी बिनविरोध निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही जाहीर भूमिका मांडलेली नाही. बिनविरोध निवडीचा अट्टाहास चुकीचा आहे, लोकशाहीत निवडणुका झाल्या पाहिजेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
तर राहुरी संदर्भात संजय राऊत म्हणाले की, काल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली असून आज शरद पवारांच्या पक्षाची बैठक आहे. राहुरीत आमच्या पक्षाकडून तीन उमेदवार इच्छुक आहेत.
राजकारणात निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते पुढे येत असतात. जरी आमच्याकडे इच्छुक असले तरी देखील महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यावा लागेल.
प्राजक्त तनपुरे हे तेथील माजी आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागची निवडणूक लढवलेली आहे. ते यावेळी निवडणूक लढणार आहेत की नाही, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज निर्णय होईल आणि त्यानंतर आम्ही त्यावर निर्णय घेऊ. त्यानंतर काँग्रेस पक्ष राहील,” असेही संजय राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा:






