सांगलीतून अजून काही पक्ष प्रवेश होतील का? पत्रकाराच्या प्रश्नाला फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर

Devendra Fadnavis on Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अण्णासाहेब डांगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. अण्णासाहेब डांगे सांगलीतील बडे नेते आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी फडणवीस यांना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल आडून प्रश्न विचारण्यात आला. त्याला फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सांगलीतून अजून काही पक्ष प्रवेश होतील का? असा प्रश्न एका पत्रकारानं अण्णासाहेब डांगे यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले. त्यावर ‘तुम्हाला अपेक्षित असलेला प्रवेश आमच्या मनात सध्या तरी नाही,’ असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. पाटील यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल अप्रत्यक्षपणे विचारण्यात आलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी दिलेले उत्तर ऐकून अनेकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्यालदेखील भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दलही फडणवीस यांना विचारण्यात आलं. ‘पक्ष प्रवेशाबद्दलचा निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष घेत असतात. त्यांनी घेतलेले निर्णय आम्हाला मान्य असतात. कैलास गोरंट्याल जालन्यातली महत्त्वाचे नेते आहेत. ते अनेक वर्षे आमदार राहिलेले आहेत. जमिनीशी नाळ घट्ट असलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. अशा नेत्यांना प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश देत आहेत. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो,’ असे फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis on Jayant Patil |
अण्णासाहेब डांगे स्वगृही परतले
अण्णासाहेब डांगेंबद्दल फडणवीस म्हणाले की, “अण्णांचं स्थान पक्षात खूप मोठं होतं. गोपीनाथरावजीही अण्णांशी सल्लामसलत केल्याशिवाय निर्णय घ्यायचे नाही. युतीचे सरकार असताना प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीआधी गोपीनाथराव अण्णांसोबत बैठक घ्यायचे आणि तिथेच निर्णय करून मग मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जायचा. अण्णा मी आजही आपल्याला सांगतो की, जेव्हा पक्षातून जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पक्षातील कार्यकर्त्यांना दुःख झालं. याचं शल्य गोपीनाथरावांनाही होते. कारण ते अनेकदा बोलून दाखवायचे”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचा :
अमरावतीतील मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गोळा; काय आहे ‘हा’ विचित्र आजार?





