Akhilesh Yadav : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अखिलेशही उतरणार? ‘त्या’ बॅनरमुळे चर्चेला फुटले तोंड

Akhilesh Yadav – उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमधील समाजवादी पक्षाच्या (सप) कार्यालयाबाहेर झळकलेल्या बॅनरवरून राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. त्या बॅनरमध्ये सपचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh yadav) यांचा उल्लेख देशाचे भावी पंतप्रधान म्हणून करण्यात आला आहे. त्यामुळे अखिलेशही पंतप्रधानपदाच्या (Prime Minister) शर्यतीत उतरण्यास उत्सुक असल्याच्या अटकळी बांधल्या जाऊ लागल्या आहेत.
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या अखिलेश यांचा सप इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीचा घटक आहे. त्या आघाडीकडून तूर्त तरी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करता आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा इरादा व्यक्त केला जात आहे. तसे असले तरी इंडियामधील काही नेत्यांच्या पंतप्रधानपदाच्या आकांक्षा दडून राहिलेल्या नाहीत.
अशात अखिलेश यांचेही नाव प्रोजेक्ट करण्याचा सपचा प्रयत्न असल्याचे संकेत संबंधित बॅनरमधून मिळत आहेत. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि सपमध्ये हातमिळवणी होऊ शकली नाही.
जागावाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर दोन्ही पक्षांत शाब्दिक युद्ध झाले. त्यामुळे त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे चित्र समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर, सपचा बॅनर राजकीय सनसनाटी निर्माण करणारा ठरला आहे.
दरम्यान, मुंगेरीलाल के हसीन सपनें अशा शब्दांत भाजपने बॅनरवरून सपची खिल्ली उडवली. उत्तरप्रदेशमधील जनतेने अखिलेश यांना नाकारले. इतर राज्यांत त्यांच्या पाठिशी जनाधार नाही. मित्रपक्ष त्यांना सोडत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तिसऱ्यांदा सत्ता सोपवण्याचे मन देशातील जनतेने बनवले आहे. सप केवळ इंडियासाठी दबावतंत्राचा वापर करत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते अवनिश त्यागी यांनी दिली.





