Pune Bridge Collapse : अजित पवार मावळ दुर्घटनेची जबाबदारी घेणार का? संजय राऊतांचा संतप्त सवाल

मावळ, पुणे : पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल रविवारी (15 जून) दुपारी साडेतीनच्या सुमारास कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, 32 जण जखमी झाले, तर 2-3 जण अजूनही बेपत्ता असण्याची शक्यता आहे. रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी आणि पुलाचा अतिभार यामुळे हा जीर्ण पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेने राजकीय वातावरण तापले असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकार आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “आमदार-खासदार विकत घेण्यासाठी पैसे आहेत, पण पूल दुरुस्तीसाठी नाही?” असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवरून महायुती सरकार आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यावर सडेतोड टीका केली. संजय राऊत म्हणाले, “मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, आणि चार जणांचा मृत्यू झाला. याचा खरा आकडा समोर येत नाही. कित्येक लोक वाहून गेले. अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना याबद्दल गर्व आणि अहंकार आहे, पण या दुर्घटनेची जबाबदारी घेणार का?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना सांगितले, “या पुलासाठी कागदावर 7-8 कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले जाते, पण पूल का बांधला गेला नाही? मंजूर पैसे कुठे गेले? आमदार-खासदार विकत घेण्यासाठी, मते विकत घेण्यासाठी पैसे मिळतात, पण जनतेच्या जीवाशी खेळणारा पूल दुरुस्त करण्यासाठी पैसे नाहीत?” असंही संजय राऊत म्हणाले.
“11 जुलै 2024 रोजी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी मंजुरी दिल्याचे पत्र रवींद्र भेगडे यांना पाठवले होते. 8 कोटींच्या कामासाठी 80 हजारांचे पत्र मंजूर करणारे मंत्री झोपलेले असतात. हेच सरकारचे जनतेच्या प्रति प्रेम आहे. मोठ्या बिल्डरांची आणि ठेकेदारांची कामे करताना सरकार जागे असते, पण अशा छोट्या कामात झोपलेले असते,” असं म्हणत राऊत यांनी सरकारवर निष्काळजीपणाचा आणि प्राधान्यक्रम चुकवण्याचा आरोप केला आहे.
“सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात?” राज ठाकरेंचा सवाल
“सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही?
बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग?” असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला सुनावले आहे. Raj Thackeray |
मी तिघांचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला
दरम्यान, योगेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी मृत्यूला डोळ्यांदेखत पाहिलं. पूल कोसळला तेव्हा मी आणि शिल्पा मध्यभागी होतो. ज्या तिघांचा मृत्यू झाला, त्यांचा मृत्यू मी जवळून पाहिला. लोक ओरडत होते, ‘घाई करू नका, जाऊ नका,’ पण कोणी ऐकलं नाही. अचानक पूल खचला आणि सगळे नदीच्या पाण्यात पडलो. मी आणि शिल्पा कसेबसे किनाऱ्यापर्यंत पोहचलो, पण अनेकजण प्रवाहात वाहून गेले.”





