Eknath Shinde : “मी शिवरायांची शपथ घेतली अन्….”; मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले होते. सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन थांबविण्यात आलं. पण सध्या मराठा आरक्षणाला घेऊन सरकारने जारी केलेल्या जीआरची सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.
या सर्व घडामोडी घडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगल्याची देखील चर्चा सुरू होती. आता एकनाथ शिंदे यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत यावर प्ररखडपणे भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला एसइबीसीचे 10 टक्के आरक्षण दिलं होतं, पण ज्यांना हे आरक्षण टिकवता आलं नाही, त्यांना प्रश्न विचारा असा सवाल त्यांनी मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केला. मी भर स्टेजवर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, अशी आठवण देखील त्यांनी सांगितली.
हीच आम्ही पहिलेपासूनची भूमिका
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याची मागणी केल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आणि त्यांनी देखील आंदोलन छेडले होते. या प्रकरणी बोलताना शिंदेंनी मराठा समाजाला काहीही देत असताना ओबीसी समाजाचं आरक्षण कमी न करता देणं हीच आम्ही पहिलेपासूनची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं आहे.
कुठल्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही
पुढे ते बोलताना शिंदे म्हणाले, आम्ही असं आरक्षण दिलं जे कोर्टात टिकलं आणि त्यासंदर्भात मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भरपूर चर्चा केली. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना प्रमाणपत्र मिळतील, असा नियम आधीपासूनच आहे. कुठल्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही, असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी यावेळी बोलताना दिलं.
सगळे निर्णय आम्ही एकत्र घेतले
मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भात सरकारकडून समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अध्यक्षपद देण्यात आलं. मराठा आरक्षणा प्रकरणी जो निर्णय घेण्यात आला. त्यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, आम्ही एकत्र बैठकीला होतो. सगळे निर्णय आम्ही एकत्र घेतले आहेत.
अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे सगळे नेते आम्ही एकत्र बसून तोडगे काढलेत. सरकार म्हणून आम्ही जे निर्णय घेतले ते टिकवण्याची आमची जबाबदारी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एबीपी माझा या न्यूज चॅनेलने मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा : अफगाणिस्तानमध्ये चौथ्यांदा भूकंप ; ४.८ रिश्टर स्केलचा पुन्हा एकदा धक्का, एका आठवड्यात २२०० जणांचा मृत्यू





