लॉस एंजेलिसच्या उत्तरेला भीषण वणवा; १,२०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

गोरमान (लॉस एंजेलिस, अमेरिका) – लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील भागात भीषण वणवा पेटल्यामुळे अधिकाऱ्यांनी या भागातून १,२०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. हा वणवा मुख्य महामार्गाजवळ हजारो एकर परिसरामध्ये पसरला आहे. यामुळे आजूबाजूच्या बांधकामांनाही धोका निर्माण झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थानिक अधिकाऱ्यांनी या वणव्याला पोस्ट फायर असे नाव दिले आहे. या आगीमुळे लॉस एंजेलिसच्या इशान्येला १०० किलोमीटर अंतरावरील एकूण ३,६०० एकर किंवा १४.५ चौरस किलोमीटर क्षेत्रातील वनसंपदा जळून नष्ट झाली आहे.
गोरमान भागातील हंग्री व्हॅली आणि पॅरामिंड तलावाच्या परिसरातील १,२०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असे फायर फायटर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आगीच्या वाटेत अडथळे उभे केले गेले असून विमानांमधून पाण्याचा मारा केला जाऊ लागला आहे.





