Pune News : मोकाट श्वानांचा सुळसुळाट…! सात जणांचा घेतला चावा; सिंहगड रस्ता परिसरातील घटना

Pune : सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड येथील जयप्रकाश नारायण-नगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास महापालिकेच्या शाळेसमोर सात मुलांना चावा घेतल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
शाळा सुटल्यावर शाळेसमोर खेळत असलेल्या या मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. यामुळे जयप्रकाश नारायण नगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात भटक्या कुत्र्यांच्या सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे कुत्रे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करीत आहेत. तसेच विद्यार्थ्यांनाही शाळेत ये-जा करताना या कुत्र्यांच्या त्रास सहन करावा लागत आहे.
नांदेड परिसरात भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. विविध भागांतून या वसाहतीत कुत्री आणून सोडली जातात. ही कुत्री रस्त्याने जाणाऱ्या दुचाकींच्या पाठीमागे लागतात. यामुळे दुचाकीचालक घाबरून जात असून, त्यांना दुचाकी चालवणेदेखील मुश्किल होत आहे. कुत्रे हल्ला करीत असल्याने दुचाकीस्वार घसरून पडून अपघात होत आहेत. महापालिका प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची गरज आहे. नाही तर निष्पाप नागरिकांवर जीव गमावण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही
मोकाट कुत्र्यांसाठी श्वान केंद्र उभारावे
सिंहगड रस्ता, शिवणेया नांदेड परिसरात लहान मुले, पादचाऱ्यांवर नसबंदी केलेल्या मोकाट कुत्र्यांचे वाढते हल्ले आणि उपद्रवामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने मोकाट कुत्र्यांच्या संभाळ करण्यासाठी श्वास सेंटर सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नसबंदी केलेल्या कुत्र्यांना पुन्हा मूळ ठिकाणी आणून सोडले जात असल्याने सिंहगड, एनडीए रस्त्यालगतच्या मुठा नदीपात्रातील दलदलीसह शिवणे, उत्तमनगर, खडकवासला, नांदेड परिसरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दररोज अनेक जण गंभीर जखमी होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नसबंदी केलेल्या कुत्र्यांसाठी श्वान सेंटर सुरू करावे, अशी मागणी भाजपचे नांदेड शिवणे मंडलचे अध्यक्ष रुपेश घुले पाटील यांनी केली आहे.
खडकवासला धरणाखालील रस्त्याच्या परिसरात अनेक मोकाट कुत्र्यांचे कळप आहेत. रात्रीच्या सुमारास एनडीए, तसेच सिंहगड रस्ता परिसरात मोकाट कुत्र्यांचे भुंकणे सुरू असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नसबंदी केलेल्या मोकाट कुत्र्यांना पकडता येत नाही. तसेच, नसबंदी करून कुत्र्यांना त्यांच्या अधिवास क्षेत्रात सोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र आहे.
नांदेड येथील जयप्रकाश नारायणनगरमध्ये ताबडतोब श्वान पथक पाठवून पिसळलेल्या आणि भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यात येईल. तसेच या घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येईल.
– प्रज्ञा पोतदार, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय





