WI vs SA 2nd Test : द. आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यात गोलंदाजांचा कहर..! पहिल्याच दिवशी 17 गडी बाद, कसोटी रंगतदार अवस्थेत…

WI vs SA 2nd Test Day 1 Stumps :- शामर जोसेफने भेदक गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १६० धावांत संपुष्टात आणला, मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या विआन मुल्डरने वेस्ट इंडिजला जशाच तसे उत्तर देताना इंडिजची अवस्था ७ बाद ९७ अशी केली. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान सुरु असलेल्या, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघाची बिकट अवस्था झाली आहे. एकाच दिवसात १७ गडी बाद झाल्याने कसोटी निर्नायक स्थितीत आली आहे. विश्व कसोटी स्पर्धेत दक्षिण आफ्रिका सातव्या तर वेस्ट इंडिज नवव्या स्थानी आहेत.
That’s it on Day 1️⃣ in Guyana!🏏#WIvSA #MenInMaroon pic.twitter.com/v6DZGLfsKa
— Windies Cricket (@windiescricket) August 15, 2024
शामर जोसेफचे पाच बळी
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. आफ्रिकेच्या २ धावा फलकावर लागल्यानंतर वेस्ट इंडिजने पहिले यश मिळविले. टोनी डीझोरजी केवळ १ धाव काढून तंबूत परतला. एडन मारकम (१४), कर्णधार तेम्बा बाऊमा (०) हे झटपट बाद झाले. त्यानंतर सुरु झालेली गळती शेवटपर्यंत थांबली नाही. डेव्हिड बेडिंगहॅम २८, ट्रिस्टन स्टब्स (२६) व काइल वेरेन (२१) यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत शामर जोसेफने आफ्रिकेचे कंबरडे मोडले होते. शामर जोसेफने १४ षटकांत ३३ धावांच्या मोबदल्यात ५ अर्धा आफ्रिकेचा संघ तंबूत धाडला. त्याला जेडेन सील्सने ३, जेसन होल्डर व गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
बर्गर-पिएडची ६३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी
३६.१ एक षटकांत दक्षिण आफ्रिकेची अवस्था ९ बाद ९७ अशी झाली होती. त्यानंतर दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला डेन पिएड आणि अकराव्या क्रमांमकावर आलेला नांद्रे बर्गर यांनी ६३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करताना आफ्रिकेला लढण्यासाठी आवश्यक असलेली धावसंख्या उभारून दिली. डेन पिएडने ४ चौकार व एका षटकारासह ३८ धावांची तर नांद्रे बर्गरने २ चौकारांसह २३ धावांची खेळी केली. दोघांच्या दमदार फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचा डाव १६० धावांवर संपुष्टात आला.
विआन मुल्डरने वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळला
विआन मुल्डर आणि नांद्रे बर्गर यांनी सुरुवातीपासून दक्षिण आफ्रिकेला धक्के देण्यास सुरुवात केली. सलामीवीर व कर्णधार क्रेग ब्रॅथवेट व मायकल लुईस यांनी केवळ २ धावांची सलामी दिली. त्यानंतर केएसी कार्टी (०), अलिक अथनाझे (१), कावेम हॉज (४) जोशुवा डिसिल्व्हा (४) यांनी खेळपट्टीवर हजेरी लावली. त्यानंतर जेसन होल्डरने ३३ तर केएसी कार्टीने २६ धावांची खेळी केली. आफ्रिकेच्या विआन मुल्डरने केवळ ६ षटके टाकताना १८ धावांच्या मोबदल्यात वेस्ट इंडिजचे ४ गडी बाद केली. नांद्रे बर्गरने २ व केशव महाराजने १ गडी बाद केला. त्यामुळे पहिल्याच दिवस अखेर वेस्ट इंडिज संघाची अवस्था ७ बाद ९७ अशी झाली. इंडिजचा संघ पहिल्या डावात ६३ धावांनी पिछाडीवर असून ३ गडी शिल्लक आहेत.




