Shamar Joseph Record : शमार जोसेफचा ‘वन मॅन शो’! एका सामन्यात ८ शिकार करत रचला इतिहास, वेस्ट इंडिजने ठोकला विजयाचा चौकार
Shamar Joseph Record : शमार जोसेफ टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एकाच सामन्यात ४ विकेट्स आणि ४ झेल घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

Shamar Joseph historic performance against Italy : टी-२० विश्वचषक २०२६ च्या साखळी फेरीत यजमान वेस्ट इंडिजने आपला दबदबा कायम राखला आहे. ईडन गार्डन्सवर झालेल्या ‘ग्रुप सी’ च्या सामन्यात वेस्ट इंडिजने इटलीचा ४२ धावांनी पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने साखळी फेरीतील सर्व ४ सामने जिंकून अजेय राहण्याचा मान मिळवला आहे. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाज शमार जोसेफ, ज्याने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा दोन्ही आघाड्यांवर ऐतिहासिक कामगिरी केली.
शे होपचे दमदार अर्धशतक –
इटलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी २० षटकांत १६५ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. सलामीवीर शे होपने ४६ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७५ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला शेरफेन रदरफोर्ड (नाबाद २४) आणि रोस्टन चेस (२४) यांनी मोलाची साथ दिली. इटलीकडून क्रिशन कलुगामेज आणि बेन मानेन्टी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
शमार जोसेफचा ‘दुहेरी’ धमाका –
🚨 RECORD ALERT 🚨
Shamar Joseph becomes the first cricketer to bag four wickets and four catches in a T20I – Men’s or Women’s 🤯#WIvsITA #WIvITA #T20WorldCup2026 #CricketTwitter pic.twitter.com/9MtPLKedX2
— Cricbuzz (@cricbuzz) February 19, 2026
प्रत्युत्तरात १६६ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना इटलीचा संघ १८ षटकांत अवघ्या १२३ धावांवर गारद झाला. शमार जोसेफने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ३० धावा देऊन ४ विकेट्स घेतले. विशेष म्हणजे, त्याने केवळ गोलंदाजीच नाही, तर क्षेत्ररक्षणातही ४ उत्कृष्ट झेल टिपले. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एकाच सामन्यात ४ विकेट्स आणि ४ झेल घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. जोसेफच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे इटलीचा डाव पूर्णपणे विखुरला गेला.
सुपर-८ मध्ये भारताशी होणार गाठ –
साखळी फेरीत इटलीसह इंग्लंड, स्कॉटलंड आणि अफगाणिस्तानला नमवून वेस्ट इंडिजचा संघ ‘ग्रुप सी’ मध्ये अव्वल स्थानी राहिला आहे. आता सुपर-८ फेरीत वेस्ट इंडिजचे आव्हान अधिक कठीण होणार आहे. पुढच्या फेरीत त्यांची गाठ भारत, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांसारख्या बलाढ्य संघांशी पडणार आहे. दोन वेळचा विश्वविजेता असलेला वेस्ट इंडिज संघ तिसऱ्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.






