AUS A vs IND A 2nd ODI : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताचा सलग पाचवा पराभव, दुसऱ्या वनडेमध्ये कांगारू 8 विकेट्सने विजयी….

AUS A vs IND A 2nd ODI : सलामीवीर मॅडी डार्कचे नाबाद अर्धशतक आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलिया अ संघाने शुक्रवारी मॅके येथे झालेल्या दुसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात भारत अ संघावर आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिला एकदिवसीय सामना चार गडी राखून जिंकला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत ‘अ’ संघाचा हा सलग पाचवा पराभव आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय महिला अ संघाला टी-20 मालिकेत 3-0 ने पराभव स्विकारावा लागला आहे.
2nd OD. Australia A Won by 8 Wickets. https://t.co/8nD41rQNBO #AUSAvINDA
— BCCI Women (@BCCIWomen) August 16, 2024
प्रथम फलंदाजी करताना भारतीय ‘अ’ महिला संघाचा डाव 48 षटकात सर्वबाद 218 धावसंख्येवर आटोपला होता. ज्यात तेजल हसबनीस आणि राघवी बिश्त यांच्या अर्धशतकी खेळींचा समावेश होता. तेजल हसबनीसने 86 चेंडूंचा सामना करताना चार चौकारासह 63 धावा केल्या तर राघवी बिश्तने 93 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार लगावताना 70 धावांची खेळी केली. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारताची धावसंख्या 40 षटकात तीन विकेट्सवर 176 धावांवर पोहोचली होती. मात्र याचा फायदा भारतीय फलंदाजांना घेता आला नाही आणि संघाने पुढील आठ षटकांत अवघ्या 42 धावांत उर्वरित सात विकेट गमावल्या.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. ज्यात मैटलान ब्राउन, निकोला हॅनकॉक आणि चार्ली नॉट यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. यामुळे भारतीय संघ अवघ्या दोन षटकांपूर्वी 218 धावसंख्येवरच गारद झाला.
विजयासाठी 219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मॅडीने ऑस्ट्रेलियासाठी 115 चेंडूत सात चौकारांसह 106 धावांची शतकी खेळी केली आणि तिची सलामीची जोडीदार केटी मॅक (68 धावा) सोबत 22.4 षटकात पहिल्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. कर्णधार ताहलिया मॅकग्रा 32 धावांवर नाबाद राहिली. कर्णधार मॅकग्रा आणि मॅडीने तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना झटपट धावा करण्यापासून रोखता आले नाही, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने 40.2 षटकात 2 बाद 221 धावा करत सहज विजय मिळवला.




