निविदा वाढीव दराने का येतात?

पुणे – शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पाच्या निविदा सतत वाढीव दराने का येत आहेत, याची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्‍वासल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिले.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी पाटील यांनी 24 तास पाणीपुरवठा, नदी सुधार आणि एचसीएमटीआर प्रकल्पाविषयी चर्चा केली. तर, प्रशासनाने त्यांच्यासमोर याचे सादरीकरण केले. प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर यामध्ये येणाऱ्या अडचणी राज्य आणि केंद्र स्तरावर कशा सोडवता येतील, याचीही चर्चा करण्यात आली.

या बैठकीला खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. समान पाणीपुरवठा आणि नदी सुधार प्रकल्पांच्या निविदा मोठ्या प्रमाणात वाढवून आल्या आहेत. मोठ्या प्रकल्पांच्या निविदा वाढवून येण्याचा “ट्रेंड’ पडत आहे, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.

“नदी सुधार प्रकल्पासाठी तब्बल 300 कोटी रुपयांनी वाढीव निविदा आली आहे. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढली आहे. दहा टक्‍क्‍याने वाढली, तर समजू शकतो परंतु त्यापेक्षा जास्त वाढली तर तपासावे लागेल. असे का झाले, याचीही चौकशी करू’ असे आश्‍वासन पाटील यांनी दिले.

याविषयी आयुक्त राव म्हणाले, “नदी सुधार प्रकल्पाची निविदा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे केंद्रशासन आणि जायका कंपनीला याबाबत कळवण्यात आले आहे. महापालिकेच्या दृष्टीने ही निविदा मान्य करणे योग्य होणार नसल्यामुळे पुन्हा निविदा काढण्यात यावी, असे कळवण्यात आले आहे.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here