“उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?”; भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यात ज्वलंत विषय बनलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह चक्रीवादळाने झालेल्या नुकसान भरपाईसंदर्भात मदत करण्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीवरून भाजपाने पुन्हा टीकास्त्र डागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? , असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे.
राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेत आहे. या भेटीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून टीका केली आहे.
आज आलं अंगावर ढकललं केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत. वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय, तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार.
झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? pic.twitter.com/s2xvS04Yw1— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 8, 2021
भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र असलेला एक फोटो ट्विट केला आहे. “आज आलं अंगावर ढकललं केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत. वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय, तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार. झेपत नाही. कळत नाही. वसुलीपुढे सरकत नाही, अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?,” असे म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
ट्विट केलेल्या फोटोवर उद्धव ठाकरेंच्या व्यंगचित्रासह “उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई घोषित करायला हवे. सतत केंद्राने हे नाही दिले, ते नाही दिले म्हणून नाक मुरडत असतात,” अशी टीका करणारा मजकूरही आहे.





