राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सायनाला डावलल्यानंतर नवरा कश्यप संतापला; म्हणाला, “जी खेळाडू…”

नवी दिल्ली – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी घोषित केलेल्या भारतीय बॅडमिंटन संघात फुलराणी सायना नेहवालला स्थान देण्यात आले नसल्याने तीचा पती व नामांकित बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याने भारतीय बॅडमिंटन संघटनेवर ताशेरे ओढले आहेत. जी खेळाडू पदक जिंकून देऊ शकेल अशाच सायनाला संघात स्थान न देण्यामागे नक्की काय विचार निवड समितीने केला, असा संतप्त सवालही त्याने केला आहे.
पुढील आठवड्यापासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये सुरु होत असलेल्या या स्पर्धेसाठी भारताचा बॅडमिंटन संघ मोठ्या कालावधीनंतर सायनाशिवाय सहभागी होत आहे. सायनाला संघातून वगळणे हा मोठा अपमान आहे. ज्या खेळाडूने देशाला ऑलिम्पिकचे पदक जिंकून दिले तीलाच संघातून बाहेर ठेवले गेले. आपलीच माणसे अशी वागतात तेव्हा खूप निराशा येते. सायनाला गेल्या काही स्पर्धांमध्ये फारसे यश मिळालेले नाही परंतू म्हणून तीच्या नावाचा विचारच करायचा नाही हे योग्य नाही, असेही कश्यपने म्हटले आहे.
सातत्याने दुजाभाव
सायना परखड बोलते म्हणजे ती उर्मट आहे असा अन्वयार्थ काही लोकांनी लावला. गेल्या काही काळापासून तीच्याबाबत असा दुजाभाव होत आहे. संघात कोणाला निवडायचे हा अधिकार संघटनेला आहे मात्र, त्यांनी सायनाशी संवादही साधला नाही. त्यांना तीच्याशी बोलावेसेही वाटले नाही. तीने पाठवलेल्या संदेशांनाही संघटनेने उत्तर दिले नाही, हा सगळा काय प्रकार आहे, अशी विचारणाही कश्यपने केली आहे.




