Saina Nehwal Retirement | बॅडमिंटन क्वीन सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली. गेल्या दोन वर्षांपासून सायना गुडघ्याच्या समस्येमुळे त्रस्त होती. अखेर तिने शरीर साथ देत नसल्याचे म्हणत आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला. सायना गेल्या दोन वर्षांपासून बॅडमिंटनपासून दूर होती आणि तिचा शेवटचा सामना २०२३ मध्ये सिंगापूर ओपनमध्ये झाला होता. एका पॉडकास्टमध्ये बोलताना सायनाने स्पष्ट सांगितले की, “माझ्या गुडघ्याची दुखापत गंभीर असून मला संधिवात झाला आहे. सर्वोत्तम खेळ करण्यासाठी तुम्हाला दिवसाला ८ ते ९ तास सराव करणे आवश्यक आहे. परंतु, माझा गुडघा अवघ्या एक-दोन तासांतच माझी साथ सोडत होता. सूजही येत होते. त्यामुळे अधिक सराव करणे, माझ्यासाठी अवघड झाले. जर तुमचे शरीर साथ देत नसेल, तर थांबणेच योग्य असते.” पुढे सायनाने सांगितले की, माझ्या पालकांना आणि प्रशिक्षकांना आपल्या शारीरिक स्थितीबद्दल स्पष्ट कल्पना दिली होती. निवृत्तीच्या औपचारिक घोषणेपेक्षा, स्पर्धांमधील तिची अनुपस्थितीच चाहत्यांना सर्व काही सांगून जाईल, असा विश्वास तिने व्यक्त केला. इतिहास घडवला… सायना नेहवालने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला होता. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला गंभीर दुखापत झाली होती, मात्र जिद्दीच्या जोरावर तिने पुनरागमन केले आणि २०१७ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्यानंतर २०१८ मध्ये तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. मात्र लंडन ऑलिंपिकमध्ये ब्रांझ मेडल जिंकून जगभरात भारताचं नाव उंचावणाऱ्या नेहवालने तिच्या कारकिर्दीचा अंत केल्याने चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. हेही वाचा: मोठी बातमी! गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा सांगलीत मृत्यू