Manipur : मणिपूरला जाऊन माफी का मागत नाही? कॉंग्रेसचा पंतप्रधान मोदींना सवाल

नवी दिल्ली – मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल त्या राज्याचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी माफी मागितली. त्यानंतर कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी मणिपूरला जाऊन माफी का मागू शकत नाहीत, असा सवाल त्या पक्षाने केला. मणिपूरमध्ये ४ मे २०२३ यादिवशी वांशिक संघर्षाची ठिणगी पडली.
त्यानंतर सुरू झालेल्या हिंसाचाराच्या सत्रामुळे त्या भाजपशासित राज्यात अशांत स्थिती निर्माण झाली. त्यावरून विरोधकांनी आणि विशेषत: कॉंग्रेसने सातत्याने भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारांना घेरले.
मोदींनी मणिपूरला भेट द्यावी, सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवावे या मागण्या विरोधकांनी लावून धरल्या. अर्थात, त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. आता दीड वर्षानंतर सिंह यांनी हिंसाचाराबद्दल माफी मागितली.
त्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी देशात आणि जगभरात प्रवास केला. मात्र, त्यांनी हेतुपुरस्सर मणिपूरला भेट देणे टाळले. ते दुर्लक्ष मणिपूरमधील जनतेच्या पचनी पडणारे नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.





