Smriti Irani : मृत मतदारांची नावे कायम का ठेवायची? स्मृती इराणींचा कॉंग्रेसला सवाल
निवडणूक आयोग म्हणजे भारतीय लोकशाहीच्या प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. आयोग जगभरात प्रशंसेचा विषय ठरला आहे, असे स्मृती भाजपच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

Smriti Irani – भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसवर जोरदार पलटवार केला. मृत आणि डुप्लिकेट मतदारांची नावे याद्यांमध्ये कायम ठेवण्याचा आग्रह कॉंग्रेस का धरत आहे, असा सवाल त्यांनी केला.
सध्याच्या लोकशाही रचनेत जनतेचा पाठिंबा मिळत नसल्याने कॉंग्रेस अस्वस्थ आहे. त्यामुळे स्वत:च्या पराभवावर आत्मचिंतन करण्याऐवजी तो पक्ष निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहे.
निवडणूक आयोग म्हणजे भारतीय लोकशाहीच्या प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. आयोग जगभरात प्रशंसेचा विषय ठरला आहे, असे स्मृती भाजपच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार भूमिका मांडली. माझ्यावर (मोदी) टीका केली तरी हरकत नाही. पण, लोकशाही आणि घटनात्मक संस्थांवर टीका केली जाऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, याकडे स्मृती यांनी लक्ष वेधले.
मोदींच्या आवाहनानंतरही कॉंग्रेस देशाच्या घटनात्मक व्यवस्थांना क्षीण करण्याचे प्रयत्न सोडताना दिसत नाही. तो पक्ष दुटप्पीपणा करत आहे.
भाजपची सत्ता नसणाऱ्या कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्यांत कॉंग्रेसची निवडणूक आयोगाला क्लीन चिट आहे का, अशी उपरोधिक विचारणाही त्यांनी केली.





