संघप्रमुखपदी महिला का नाही? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

बीड : आंतरराष्ट्रीय महिला दिन हा मातृशक्तीला अभिवादन करण्याचा दिवस आहे. पण समतेचा व स्त्री-पुरुष समानता हा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाही. महिलांना निव्वळ एक वस्तू मानणारी ही प्रवृत्ती आहे. आजपर्यंत संघप्रमुख हे पद एखाद्या महिलेला का देण्यात आलेले नाही?, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राज्यात आज याच विचाराच्या पिल्लावळींनी आका, खोक्या हा खेळ मांडला आहे. त्याविरोधी आपण रस्त्यावर उतरलो आहोत, आपण संविधानाचा विचार पुढे घेऊन जाऊ. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्त्रीभृणहत्या करण्यात येते हे चिंताजनक आहे. स्त्री-पुरुष प्रमाणात बीड जिल्हा मागे आहे.
तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम केले, त्यांची गाथा काहींनी पाण्यात बुडवली. संत ज्ञानेश्वरांनी गीता सोप्या भाषेत लिहिली, त्याचा काहींना त्रास झाला. बहुजन समाजाच्या प्रगतीत या विचाराने विरोध केला गेला. सावित्रिबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्या. त्याला विरोध करत फुले दांम्पत्यांना शेणाचे गोळे व दगड मारणारा विचारही हाच होता, असे म्हणत त्यांनी संघावर टीकास्त्र डागले.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकडोजी महाराज यांचा विचार हा आयडिया ऑफ इंडिया आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भाजपच्या राज्यात मोकाट आहेत, त्यांना सरकार संरक्षण देते, पुरस्कार देऊन गौरव करत आहे. समाजासमाजात भांडणे लावणे हा भाजपाचा विचार आहे. पण आपल्याला पुरोगामी विचाराने पुढे जावे लागणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.





