काही रेल्वे स्थानकांना ‘रोड’ हा शब्द का जोडला जातो?

जर तुम्ही ट्रेनने नियमित प्रवास करत असाल तर अनेक स्टेशन्सची नावं वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की या स्टेशनला असं नाव का पडलं असावं? उदा. काही स्टेशनच्या नावामागे जंक्शन, काहीच्या मागे हॉल्ट आणि काहीच्या मागे रोड असे शब्द आपण पाहतो. जंक्शन आणि हॉल्टचा अर्थ तुम्हाला माहित असेलच, पण स्टेशनच्या नावामागे ‘रोड’ का असतो, हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊया यामागील कारण…
रेल्वे स्थानकाच्या नावामागे रोड शब्द लावण्यामागे मोठे कारण आहे. खरे तर शहराच्या बाहेरील भागातून अनेकवेळा रेल्वे मार्ग जातो. अशा स्थितीत रेल्वे स्थानक आणि शहराला जोडणारा रस्ता असतो आणि तो दोन्ही ठिकाणांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे या स्थानकांच्या नावाला ‘रोड’ हा शब्द जोडण्यात येत असतो.
कधी कधी एकाच शहरात दोन रेल्वे स्थानके असतात. तर एक शहराजवळ आणि एक शहरापासून दूर असतो. शहरालगत असलेल्या रेल्वे स्थानकाच्या नावापुढे ‘रोड’ शब्द नसतो. परंतु शहरापासून दूर असणाऱ्या रेल्वे स्थानकाला ‘रोड’ हा शब्द जोडलेला असतो. उदाहरणार्थ, नागपूर आणि नागपूर रोड. नागपूर शहरातील रेल्वे स्थानकाचे नाव नागपूर असून शहरापासून थोडे दूर असलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव नागपूर रोड आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये मध्य मार्गावर ‘माटुंगा’ नावाचे स्थानक आणि पश्चिम मार्गावर ‘माटुंगा रोड’ नावाचे स्थानक आहे.
‘ही’ आहेत काही उदाहरणे
हजारीबाग रोड, बिलासपूर रोड, नाशिक रोड, डलहौसी रोड, गंगापूर रोड अशी अनेक स्टेशन्स आहेत, जिथे रेल्वे लाईन शहर/गावातून जात नाही. ही रेल्वे लाईन आउट-स्कर्टमधून किंवा त्याभोवती जाते. अशा प्रकरणांमध्ये स्टेशन शहर/गावात नसते आणि स्टेशनचे नाव शहर/गाव आणि त्यानंतर “रोड” हा शब्द प्रत्यय म्हणून लावला जाईल.





