Maval News: विकासाचे फक्त दावे, धड नाहीत रस्ते; मावळच्या विकासाचा विदारक चेहरा
Maval News: आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

सोपान येवले
कान्हे – कुसवली पठारावरील धनगरवाड्यातील वृद्ध व्यक्तीला आजारी अवस्थेत झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनेने मावळातील ग्रामीण विकासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यभागी असलेल्या मावळ तालुक्यात एका बाजूला मोठमोठे उद्योग, पर्यटनस्थळे, महामार्ग आणि विकासकामांची चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला उसकान, कुसवली, कांबरे, शिरदे आणि कुसूर पठारावरील धनगरवाडे व आदिवासी वाड्यांना बारमाही रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे विकासाची ही विषमता आता नागरिकांमध्ये संतापाचे कारण ठरत आहे
पठारावरील वाड्यांमध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली, प्रसूतीची वेळ आली किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर वाहन पोहोचत नसल्याने रुग्णांना खडतर पायवाटांमधून वाहून न्यावे लागते.
कुसवली पठारावरील वृद्ध व्यक्तीला झोळीतून नेण्याच्या घटनेने या परिस्थितीचे विदारक वास्तव समोर आणले आहे. रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेऐवजी झोळीचा आधार घ्यावा लागत असेल, तर विकास नेमका कुणासाठी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. रस्त्याअभावी केवळ वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत नाही.
त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. रुग्णालय गाठण्यासाठी लागणारा वेळ वाढतो. गंभीर रुग्णांची प्रकृती आणखी बिघडण्याची शक्यता असते. तसेच प्रसूतीच्या वेळी महिलांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागतो. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना पायवाटेने नेण्याची वेळ येते. त्यामुळे रस्ता हा केवळ प्रवासाचा विषय नसून नागरिकांच्या सुरक्षेशी जोडलेला प्रश्न आहे.
वर्षानुवर्षे मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. या प्रश्नावर लवकरच ठोस कार्यवाही झाली नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. आता प्रश्न केवळ एका रस्त्याचा राहिलेला नाही.
हा मावळातील दुर्गम नागरिकांच्या अस्तित्वाचा आणि मूलभूत अधिकारांचा प्रश्न बनला आहे. एका बाजूला विकासाचे गगनचुंबी दावे आणि दुसऱ्या बाजूला रुग्णाला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ कधी संपणार, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
एआयच्या युगात झोळीची वेळ
आज देश कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या युगात झेपावत आहे. गावागावात डिजिटल सेवा आणि स्मार्ट सुविधा पोहोचविण्याचे दावे केले जात आहेत.
मात्र मावळच्या दुर्गम भागातील नागरिकांना आजही बारमाही रस्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. एखाद्या वृद्धाला उपचारासाठी झोळीतून वाहून न्यावे लागत असेल, तर विकासाच्या या विरोधाभासाकडे प्रशासन किती दिवस डोळेझाक करणार, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
निवडणूक संपल्यावर – हम आपके है कौन?
रस्त्याच्या मागणीसाठी संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. मात्र वर्षानुवर्षे मागणी करूनही प्रश्न कायम आहे. निवडणुकीच्या काळात दुर्गम वाड्यांमध्ये आश्वासनांचा पाऊस पडतो. रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य सुविधा देण्याची आश्वासने दिली जातात. मात्र निवडणूक संपल्यानंतर या वाड्यांकडे पुन्हा दुर्लक्ष होते, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.





