#FIFAWorldCup | फिफा वर्ल्डकपमध्ये भारताला स्थान का दिले जात नाही? कधी संधी मिळाली आहे का? जाणून घ्या…

सध्या जगभरात सर्वत्र फिफा विश्वचषकाचीच चर्चा सुरु आहे. कतारमधील दोहा येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला आणि विजेतेपद जिंकले. फुटबॉल खेळातील अर्जेंटीनाचा मेस्सी, फ्रान्सचा एमबाप्पे, ब्राझीलचा नेमार आणि पोर्तुगालच्या रोनाल्डो यांची नवे अवघ्या जगाला माहिती आहेत. त्याचबरोबर कालचा अंतिम सामना आपल्या भारतातही मोठ्या संख्येने पहिला गेला. देशातील अनेक राजकीय नेत्यांनी आपण हा सामना पहिला, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. त्यासोबतच सर्वांनी विश्वविजेता बनलेल्या अर्जेंटिनाला शुभेच्छा दिल्या तर फ्रान्सच्या संघाचे आणि एमबाप्पेचे कौतुकही केले.
FIFA WC 2022 Final | खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा नेता! खेळाडूंना धीर देण्यासाठी उतरला मैदानात
लोकसंख्या अफाट तरीही चांगले खेळाडू नाहीत
फुटबॉल क्षेत्रातील या घडामोडी घडत असताना तुम्हाला असे प्रश्न पडले असतील की, फिफा वर्ल्डकपमध्ये भारताला स्थान का दिले जात नाही? भारताला या स्पर्धेत खेळण्यासाठी कधी संधी मिळाली आहे का? भारताची लोकसंख्या पहिली तर हे प्रश्न प्रत्येकालाच पडतील, त्यात नवल वाटण्यासारखे काहीही नाही. भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर फुटबॉल खेळासाठी एका संघात ११ खेळाडूंची गरज असते आणि एव्हढे खेळाडू तयार न होणे ही मात्र आश्चर्यकारक बाब आहे. भारतात क्रिकेट खेळाप्रमाणे फुटबॉलला लोकप्रियता मिळत नाही. एका प्रकारे भारतात क्रिकेटला डोक्यावर घेतलं जातंय, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष
ग्रामीण भागात अनेक खेळाडू निर्माण होतात. मात्र त्यांना सोयीसुविधा मिळत नाहीत आणि ते आपोआप खेळापासून स्वतःला लांब ठेवतात. मोठ्या स्थरावर खेळण्यास खेळाडूंना तयार करण्यासाठी ग्रामीण भागातील पाया मजबूत करणे गरजेचे आहे. शहरी भागात खेळाडूंना खेळण्यासाठी, सरावासाठी मैदान, वेगवेगळे क्लब आहेत. मात्र, आजदेखील ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाबाबतचे पायाभूत शिक्षणही मिळत नाही. कित्येक शाळा आणि महाविद्यालयांना खेळाची मैदानेच नाहीत. अशा परिस्थितीमागचे नेमके कारण काय? हे तर शासनाला आणि राज्यकर्त्यांनाच माहिती असेल.
FIFA WC 2022 Final | खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा नेता! खेळाडूंना धीर देण्यासाठी उतरला मैदानात
भारत पात्रता फेरीच्या कोड्यात गुंतलाय
फुटबॉलची फिफा विश्वचषक ही जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे. मात्र, या स्पर्धेत भारताचे साधे नावही ऐकायला मिळत नाही. कारण भारतीय संघ यंदाच्या फिफा विश्वचषकासाठीही पात्र ठरण्यात अपयशी राहिला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागली होती. तर आशियातील कतार, सौदी अरेबिया, इराण, जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया या सहा संघांना फिफा विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. भारत फुटबॉल विश्वचषकासाठी कधीही पात्र ठरला नाही, असे नाही.
संधी मिळाली मात्र संघाचा खेळण्यास नकार
भारत १९५० साली ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी पात्र ठरला होता, तरीही संघ त्या स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. सर्वात मोठे कारण म्हणजे भारतीय खेळाडूंना त्यावेळी बूट न घालता पायाने फुटबॉल खेळण्याची सवय होती. अशा वेळी फिफाच्या नियमांनुसार, खेळाडूंना विश्वचषक हा बूट घालूनच खेळावा लागणार होता. परंतु भारतीय खेळाडूंना बूट घालून फुटबॉल खेळण्याची सवय नव्हती, त्यामुळे संघाने त्यावेळी स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता.
त्याचबरोबर त्यावेळी संघाने फिफा विश्वचषक न खेळण्याबाबत इतर करणेही समोर आली. या स्पर्धेचे सामने परदेशातील मैदानावर होणार असल्याने भारतीय फुटबॉल संघटनेने तसेच सरकारने खेळाडूंचा खर्च उचलण्यास नकार दिला. माहितीनुसार, त्यावेळी फिफा स्वतः भारत दौऱ्याचा खर्च उचलण्यास तयार होता, परंतु तरीही भारत या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. संघातील निवडीवरून वाद, सरावाचा अभाव अशी अनेक सहभागी न होण्याची कारणे ठरली.
१९५० च्या फिफा विश्वचषकानंतर भारतीय संघ पुन्हा कधीही या मोठ्या स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही. फिफाच्या जागतिक क्रमवारीतही भारतीय फुटबॉल संघाची स्थिती अत्यंत निराशाजनक आहे. भारतीय संघाची सध्याची क्रमवारी १०६ आहे. म्हणजेच अव्वल-१०० देशांमध्येही भारताचा समावेश होत नाही. क्रिकेट हा खेळ सोडला तर इतर कोणत्याही खेळात चित्र हे सारखेच आहे. त्यामुळे या परिस्थितीला राज्यकर्ते आणि शासनही जबादार आहे.





