देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न दमानिया का करता? सुषमा अंधारेंची पोस्ट चर्चेत

मुंबई : धनजंय मुंडे हे कृषिमंत्री असताना त्यांच्या काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेतून केवळ धनजंय मुंडे यांना लक्ष्य करताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेफ करण्याचा प्रयत्न अंजली दमानिया का करत होत्या ते कळलं नाही? असा प्रश्न शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दमानिया यांच्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुषमा अंधारे यांची पोस्ट काय?
अंजली दमानियांच्या लढ्याबद्दल कौतुकच. पण, पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न अंजली दमानिया का करत होत्या ते कळलं नाही, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेतील एक वाक्य, ”एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि तोही कराडच ” हे वाक्य पत्रकार परिषदेला जातीय रंग देणारे आहे, याचे कृपया त्यांना भान असावे.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक कराड किंवा या हत्या प्रकरणाशी संबंधित जो जो गुन्हेगार आहे, त्या प्रत्येकाला फाशीच व्हायला हवी. मात्र, कराड नावाची प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच असते हा चष्मा काढून टाका. कारण, मग या न्यायाने आपण वि.दा.कराड यांना सुद्धा गुन्हेगार ठरवायला मागेपुढे बघणार नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फोकस हलू नये यासाठी ही मांडणी महत्वाची आहे, असं सुषमा अंधारे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अंजली दमानिया यांचे आरोप काय?
महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात मंत्री धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्याचे केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवले. महाबीज, केव्हीके आणि एमएआयडीसीच्या योजनांचे पैसे डीबीटी मार्फत न देता उपकरणांच्या खरेदीसाठी टेंडर काढण्यात आले. या टेंडरमध्ये बाजारभावाच्या दुप्पट दराने वस्तुंची खरेदी करण्यात आली. त्यासाठी मुंडे यांनी पाठपुरावा करून डीबीटी घटकांच्या यादीतून काही गोष्टी वगळायला लावल्या. या सगळ्याच्या माध्यमातून किमान 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांच्या आरोपावर धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जे आरोप केले त्याबाबत माझं स्पष्ट मत आहे की, त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणे आणि धादांत खोटे आरोप करणे यापलिकडे काहीही नाही. मार्च २०२४ मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया, ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला, त्या निविदा प्रक्रिया सरकारच्या नियमाप्रमाणे राबवण्यात आल्या आहेत. मात्र, तरी देखील गेल्या ५८ दिवसांपासून अंजली दमानिया हे माझ्यावर वेगवेळे आरोप करत आहेत, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
पुढे म्हणाले, काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दमानिया यांनी असाच एक आरोप केला होता. काही आरोपींचा मर्डर झाला. अशा प्रकारचे सनसनाटी निर्माण करण्यासाठी दमानिया आरोप करतात आणि स्वत:ला प्रसिद्धी मिळवत आहेत. यामधून दुसऱ्यांना बदनाम करण्याच्या पलिकडे दुसरं कीहीही नाही, अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत बोलताना आज दमानिया देवेंद्र फडणवीस आणि तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न का करत होत्या ते कळलं नाही… ! @PTI_News #Betweentheline pic.twitter.com/nXrJwVH61E
— SushmaTai Andhare (@andharesushama) February 4, 2025





