Disha saliyan : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशीची गरज का? हे पटवून द्या, मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर काही दिवसांनी त्याची सेक्रेटरी दिशा सालियन हिने देखील आत्महत्या केली होती. दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी भाजप नेत व मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने आवाज उठवत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या दोघांच्या आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.
यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारत त्यांना त्यांचे म्हणणे दोन आठवड्यांत सादर करण्याचे सूचवले आहे. तसेच आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज का? हे पटवून द्या, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला आहे. दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचीही याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल आहे. आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी, असा अर्ज आदित्य ठाकरेंच्यावतीने देण्यात आला आहे.
दाखल केलेल्या याचिकेतून मागणी काय?
दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशीची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. 8 जून 2020 रोजी दिशा सालियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांच मोबाईल लोकेशन तपासले जावे. कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
तसेच 13 व 14 जून 2020 रोजीचे सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावे. या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासले जावे, अशी मागणी याचिकेतून केली आहे.
माझीही बाजू ऐकून घ्यावी, आदित्य ठाकरेंचा हायकोर्टात अर्ज
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील अशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आहे. यानंतर या याचिकेवर आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप घेत याचिका दाखल केली आहे. आज यावर एकत्र सुनावणी पार पडली आहे. आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पासबोला यांनी यावेळी कोर्टात बाजू मांडली. आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पाचबोला यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर, याचिकाकर्त्यांचे वकील निलेश ओझा यांनीही यावर प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्य न्यायमूर्ती आलोक अधारे यांनी हस्तक्षेप केला.
आरोप करावेसे का वाटतात? कोर्टाचा सवाल
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या याचिकेत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अनेक तपास एजन्सी तपास करत आहेत. मग, तुम्हाला हे आरोप करावेसे का वाटतात? असा सवाल कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारला आहे. तर याचिकाकर्ते म्हणून आधी आमची बाजू ऐकावी, अशी आग्रही भूमिका याचिकाकर्त्यांचे वकिल यांनी केली. त्यावर मात्र आदित्य ठाकरे यांची भूमिका ऐकण्यास मुख्य न्यायमूर्ती आलोक अधारे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांची सहमती दर्शवली.





