Sayali Sanjeev : आडनावाऐवजी का लावते वडिलांचं नाव? सायली संजीवचा भावुक खुलासा, म्हणाली….
सायलीच्या नावामागे दडलेली एक भावनिक गोष्ट अनेकांना माहीत नसेल. ती आपल्या नावापुढे स्वतःचं मूळ आडनाव न लावता वडिलांचं नाव लावते.

Sayali Sanjeev : मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सायली संजीव आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यापासून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सायलीने अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग निर्माण केला.
‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील तिच्या भूमिकेने ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘ओले आले’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. तिच्या सौंदर्याची, अभिनयाची आणि वैयक्तिक आयुष्याची नेहमीच चर्चा होत असते.
मात्र, सायलीच्या नावामागे दडलेली एक भावनिक गोष्ट अनेकांना माहीत नसेल. ती आपल्या नावापुढे स्वतःचं मूळ आडनाव न लावता वडिलांचं नाव लावते. यामागे प्रसिद्धी किंवा चित्रपटसृष्टीतील वेगळी ओळख निर्माण करण्याचा हेतू नसून वडिलांवरील तिचं निस्सीम प्रेम आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीत यामागचं कारण सांगितलं असून तिच्या या खुलाशाने चाहत्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे.
काय आहे सायली संजीवच्या नावामागची गोष्ट?
अभिनेत्री सायली संजीव हिचं पूर्ण नाव ‘सायली संजीव चांदसरकर’ असं आहे. तिचं मूळ आडनाव चांदसरकर असलं, तरी ती मनोरंजनविश्वात ‘सायली संजीव’ या नावाने ओळखली जाते. विशेष म्हणजे, तिने मनोरंजनविश्वात पदार्पण करण्यापूर्वीच आपल्या नावात हा बदल केला होता. त्यामुळे हा निर्णय केवळ सिनेसृष्टीतील ओळख निर्माण करण्यासाठी घेतलेला नव्हता.
मुलाखतीत सायलीने यामागचं कारण स्पष्ट केलं. ती म्हणाली, “मी या क्षेत्रात येण्यापूर्वीच माझं नाव बदललं होतं. सिनेइंडस्ट्रीसाठी मी नाव बदललेलं नाही. प्रत्येकाला नावासोबत आडनाव पुकारण्याची सवय असते. माझी अशी इच्छा होती की, मला आडनावाने जरी बोलवायचं असेल, तर ते माझ्या वडिलांचं नाव असावं. माझं ते स्वप्न पूर्ण झालं.”
पुढे बोलताना सायलीने या निर्णयामागची आणखी एक भावनिक बाजू सांगितली. तिच्या काही चित्रपटांना मिळालेल्या पुरस्कारांवरही ‘सायली संजीव’ असंच नाव लिहिलं जातं. त्यामुळे आपल्या वडिलांसाठी काहीतरी करू शकले, त्यांचं नाव कायम आपल्यासोबत राहावं, याचं तिला विशेष समाधान वाटतं. व
वडिलांच्या आठवणी नावातून आजही जपते सायली!
सायली संजीव आणि तिचे वडील संजीव चांदसरकर यांचं नातं अतिशय जिव्हाळ्याचं होतं. वडिलांचं नाव कायम आपल्या नावासोबत असावं, अशी तिची मनापासून इच्छा होती. त्यातूनच तिने आपल्या मूळ आडनावाऐवजी वडिलांचं नाव लावण्याचा निर्णय घेतला.
मात्र, २०२१ मध्ये कर्करोगाशी झुंज देताना सायलीच्या वडिलांचं निधन झालं. हा तिच्यासाठी मोठा भावनिक धक्का होता. आज वडील तिच्यासोबत नसले, तरी त्यांचं नाव मात्र तिच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनलं आहे






