Norwegian journalist : PM मोदींना प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराचा व्हिसा ऐनवेळी रद्द; भारतात येण्यापासून रोखलं, VIDEO व्हायरल !
त्यांनी सांगितले की, भारतात येण्यासाठी आपण उत्सुक होतो. प्रवासाची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र, ऐनवेळी आलेल्या फोनमुळे आपला भारत दौरा रद्द झाला.

Norwegian journalist – नॉर्वेतील ‘डॅग्सव्हिसेन’ या वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या हेले लिंग स्वेन्सन यांना हैदराबादमध्ये १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘भारत समिट’मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेत ‘माध्यमांचे भविष्य’ आणि पत्रकारितेचे स्वातंत्र्य या विषयावरील चर्चासत्रात त्या वक्त्या म्हणून सहभागी होणार होत्या. भारतात येण्यासाठी त्यांना व्हिसा मिळाला होता, तसेच कार्यक्रमासाठी आवश्यक राजकीय मंजुरीही मिळाल्याचा त्यांचा दावा आहे.
मात्र, ११ नोव्हेंबर रोजी भारतात येण्यासाठी विमानतळाकडे रवाना होण्याच्या अवघ्या दहा मिनिटे आधी त्यांना नॉर्वेतील भारतीय दूतावासाचा फोन आला. यावेळी त्यांना भारतात प्रवास करता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आपला व्हिसा रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Norwegian journalist)
या घटनेनंतर हेले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, भारतात येण्यासाठी आपण उत्सुक होतो. प्रवासाची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र, ऐनवेळी आलेल्या फोनमुळे आपला भारत दौरा रद्द झाला. विशेष म्हणजे, व्हिसा जारी झालेला असतानाही भारतात प्रवेश करता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
मोदींना विचारला होता थेट प्रश्न; नेमकं काय घडलं होतं?
हेले लिंग यांचे नाव भारतात चर्चेत येण्यामागे मे २०२६ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नॉर्वे दौरा हे महत्त्वाचे कारण आहे. १८ मे रोजी ओस्लो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. यावेळी पत्रकार हेले लिंग यांनी मोदींना थेट प्रश्न विचारला होता.
I got a visa to India and was supposed to leave this morning to attend the Bharat Summit in Hyderabad. I had been invited as a panelist and speaker on the future of media and press freedom.
But «orders from above» in the Ministry of Home Affairs have cancelled my visa.
Here is my message for @AmitShah
— Helle Lyng (@HelleLyngSvends) November 11, 2026
‘जगातील सर्वात मुक्त माध्यमांच्या पत्रकारांकडून तुम्ही प्रश्न का स्वीकारत नाही?’ अशा आशयाचा सवाल त्यांनी मोदींना केला होता. मात्र, मोदी यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही आणि पत्रकार परिषद संपल्यानंतर ते तेथून निघून गेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर हेले लिंग भारतात चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
व्हिसा रद्द झाल्यानंतर हेले लिंग यांनी या निर्णयामागे राजकीय कारण असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वेत विचारलेला प्रश्न, त्यानंतर सरकारच्या कारभारावर केलेली टीका आणि भारतातील काही प्रभावशाली उद्योगपतींबाबत व्यक्त केलेली मते यामुळे आपल्याला भारतात येण्यापासून रोखले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
या प्रकरणात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट उद्देशून व्हिडीओच्या माध्यमातून सवाल केले आहेत. आपल्याकडे व्हिसा आहे, परिषदेसाठी राजकीय मंजुरी मिळाली आहे आणि हैदराबादमध्ये कार्यक्रमाचे आयोजक आपली वाट पाहत आहेत, तरीही भारतात येण्यास मनाई का करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच, भारतात येण्याची परवानगी देण्याबाबत सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आपल्या चर्चासत्राला अजून वेळ असल्याने पुढील विमानाने भारतात पोहोचण्याची संधी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.





