Ajit Pawar : कुटुंबात फुट पाडून वेगळा का झालो? अखेर अजित पवारांनी उलगडला खरा अध्याय

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे चिंतन शिबीर नागपुरात जोरदार सुरू असून, या व्यासपीठावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षफुटी आणि भाजपसोबत महायुती सरकारमध्ये जाण्याच्या निर्णयावर पहिल्यांदाच मन मोकळे केले. “कुटुंबात फूट पाडून वेगळे का झालो? ही वैयक्तिक वेदना असली तरी महाराष्ट्राच्या स्थिरतेसाठी घेतलेला धाडसी निर्णय आहे,” असे स्पष्ट करत अजित पवारांनी अखेर लोकांच्या मनातील शंकांना उत्तर दिले.
म्हणून घेतला महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय?
शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, “भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय सत्ता किंवा पदासाठी नव्हे, तर महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयांची गरज असल्याने घेतला. कुटुंबातील नातेसंबंधांसाठी वेदना सोसल्या, पण राज्याच्या हितासाठी हा मार्ग स्वीकारला. आम्ही सरकारमध्ये ज्युनियर पार्टनर आहोत, तरीही विकासाच्या दिशेने योगदान देण्याचा प्रयत्न करतोय.” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
हे शिबीर एम्प्रेस पॅलेस येथे आयोजित करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, इंद्रनील नाईक, नबाव मलिक, सुनेत्रा पवार, चंद्रकांत पाटील यासह ५०० हून अधिक प्रमुख पदाधिकारी, मंत्री, आमदार-खासदार सहभागी झाले आहेत.
शिबीरात दहा प्रमुख विषयांवर चर्चा होत असून, युवकांच्या बदलत्या आकांक्षा, महिला सुरक्षा, शेतकरी-कामगार हित, तंत्रज्ञानाचा समाजाशी संबंध, शिक्षण-रोजगार धोरणे, पक्ष विस्तार रणनीती आणि बूथ-स्तरीय तयारी यावर सखोल विचारमंथन सुरू आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर आधारित ‘प्रगत महाराष्ट्र’ घडवण्याच्या उद्देशाने हे शिबीर आयोजित झाले आहे.
निवडणूक रणनीतीवर लक्ष केंद्रित
आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विशेष जोर दिला जात असून, विदर्भातील नागपूरसह संपूर्ण भागात यश मिळवण्यासाठी बूथ रचना आणि युवा-महिला केंद्रित धोरणांवर चर्चा होत आहे. अजित पवार यांनी मंत्र्यांना इशाराही दिला की, पक्षकार्यात सक्रिय नसणाऱ्यांनी पद सोडावे. “रोज रात्री झोपण्यापूर्वी पक्षाच्या यशाचा आढावा घ्या, अन्यथा जागा मोकळी करा,” असे सांगत त्यांनी धाडसी निर्णय घेण्याचा आग्रह केला. शिबिराच्या शेवटी नागपूर जाहीरनामा प्रसिद्ध होईल, जो पक्षाच्या भविष्यातील दिशेचे मार्गदर्शक ठरेल.
हे शिबीर पक्षाच्या पुढच्या पिढीसाठी असल्याचे सांगत अजित पवार म्हणाले, “येत्या काळात धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीची विचारधारा गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वजण एकजूट व्हावे.” या चिंतनाने पक्षात नवसंजनाची चिन्हे दिसत असून, महायुतीतील भूमिकेला नवे वैभव लाभेल, अशी अपेक्षा आहे.





