काँग्रेसने आपल्या सर्वोच्च नेत्यासाठी न्यायालयात जायला इतके दिवस का लावले ? भाजपचा सवाल

नवी दिल्ली – राहुल गांधी आज त्यांच्या अपात्रतेबाबत न्यायालयात अपील करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि भाजपमध्ये संघर्ष टोकाला गेलेला पाहायला मिळतोय. काँग्रेसने ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी नुकतीच भाजपच्यावतीने करण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, “काँग्रेसने अखेरीस न्यायव्यवस्थेवर विश्वास दाखवला आहे आणि आता ओबीसी समाजाचा ‘अपमान’ केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे.” पत्रकारांशी संवाद साधताना पुनावाला यांनी ही मागणी केली, ‘हे स्वागतार्ह पाऊल आहे. उशीर झाला तरी काँग्रेसने न्यायव्यवस्थेवर विश्वास दाखवला आहे असं ते यावेळी म्हणाले.
एका प्रश्नाला उत्तर देताना पुनावाला म्हणाले की, अनेक काँग्रेस नेते राहुल गांधींना न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या विरोधात काळे कपडे घालून आणि ‘काळ्या हेतूने’ निषेध करत आहेत. “काँग्रेसने आपल्या ‘उच्च’ नेत्यासाठी उच्च न्यायालयात जाण्यास इतके दिवस का लावले हे विचार करण्यासारखे आहे असंही पुनावाला यावेळी म्हणाले.
पूनावाला यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर रामनवमीच्या मिरवणुकीनंतर राज्यात काही ठिकाणी झालेल्या जातीय हिंसाचाराबद्दलही टीका केली. त्यांच्यावर ‘तुष्टीकरण’ केल्याचा आणि आरोपींवर कारवाई न केल्याचा आरोप यावेळी पुनावाला यांनी केला.





