अशर्रफ घनी यांनी का सोडला देश ?, व्हि़डीओ बनवून सांगितलं कारण…

आबुधाबी – अफगाणिस्तानमधून परागंदा झालेले माजी अध्यक्ष अशर्रफ घनी यांनी देश सोडल्यापासून प्रथमच काही वक्तव्य केले आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपात होऊ नये म्हणूनच आपण देश सोडल्याचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे. आपण देशातून बाहेर जाताना हेलिकॉप्टर भरून पैसे घेऊन पळाल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे.
घनी यांनी देश सोडल्यापासून त्यांचा कोठेही ठावठिकाणा नव्हता. ते गायब झाल्यानंतर तीन दिवसांनी संयुक्त अरब अमिरातीने त्यांच्या आश्रयाबद्दलची माहिती दिली. घनी यांनी गुपचूपपणे देश सोडल्याबद्दल त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी टीका व्हायला लागली आहे.
अफगाणिस्तानातील लोक त्यांना देशद्रोही म्हणायला लागले आहेत. मात्र तालिबानींकडून आपल्याला फाशी दिले जाण्याची शक्यता सुरक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त झाल्यामुळे आपल्याला देश सोडून पळून जावे लागले, असे घनी म्हणाले. तालिबानने पूर्वी माजी अध्यक्ष नजिबुल्लाह यांना रस्त्यावरील ट्रॅफिक सिग्नलला फासावर लटकवले होते. त्याप्रमाणे आपल्याला भर चौकात फाशी द्यायला नको, म्हणून आपण देश सोडल्याचे घनी म्हणाले.





