Pakistan Afghanistan conflict: भ्याड पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले ; कुनार-पक्तिकामध्ये नुकसान
Pakistan Afghanistan conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या कुनार आणि पक्तिका प्रांतांमध्ये हवाई हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pakistan Afghanistan conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या कुनार आणि पक्तिका प्रांतांमध्ये हवाई हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यांमध्ये काही जण जखमी झाल्याचा दावा स्थानिक सूत्रांकडून करण्यात आला आहे. मात्र, जखमींची नेमकी संख्या आणि हल्ल्याची संपूर्ण माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानी लढाऊ विमाने परिसरात दिसून आली. त्यानंतर कुनारमधील नर्गल जिल्ह्यातील पतंग भागात हवाई हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात नूर मोहम्मद यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून आसपासच्या घरांनाही फटका बसल्याची माहिती आहे.

हल्ल्याच्या वेळी संबंधित घरात किती लोक होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. स्थानिक प्रशासनाकडून नुकसानाचा आढावा घेतला जात असून मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.
दोन्ही देशांमध्ये तणावाचे प्रमुख मुद्दे कोणते? Pakistan Afghanistan conflict:
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावामागे डुरंड रेषा आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) हे प्रमुख मुद्दे आहेत. १८९३ मध्ये ब्रिटिश काळात निश्चित करण्यात आलेली सुमारे २,६४० किलोमीटरची डुरंड रेषा अफगाणिस्तान अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्य करत नाही.
TTPच्या मुद्द्यावर पाकिस्तानकडून, “या संघटनेला अफगाणिस्तानमध्ये आश्रय मिळतो आणि तेथून पाकिस्तानविरोधात कारवाया केल्या जातात.” असे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, अफगाणिस्तानने हे आरोप फेटाळले आहेत.
दोन्ही देशांमध्ये यापूर्वीही सीमावर्ती भागात चकमकी आणि हवाई कारवायांच्या घटना घडल्या आहेत. पाकिस्तानच्या कारवायांना अफगाणिस्तानकडूनही प्रत्युत्तर दिले जाते. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.





