Pakistan – पाकिस्तानने रात्रीच्यावेळी अफगाणिस्तानच्या हद्दीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये तब्बल ४०० लोक ठार झाले आहेत. पाक सैन्याने हा हल्ला अफगाणिस्तानमधून कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांना, त्यांना मदत करणाऱ्या गटांना आणि लपण्याच्या ठिकाणांना नष्ट करण्यासाठी केला होता, असे सांगितले आहे. मात्र हा हल्ला काबूलमधील पुनर्वसन रुग्णालयावर करण्यात आला होता, असे अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने म्हटले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीतून दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांना लक्ष्य करण्यासाठी २६ फेब्रुवारीपासून ऑपरेशन गजब लिल हक सुरू केले आहे. हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे, असे पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी १६ मार्चच्या रात्री ऑपरेशन गजब लिल हक अंतर्गत अफगाण तालिबान्यांविरोधात काबूल आणि नानगरहारमधील दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी नेमक्या ठिकाणी हा हवाई हल्ला केला, असे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या हल्ल्यात काबूलमधील दोन ठिकाणची तांत्रिक सहाय्य पायाभूत सुविधा आणि दारुगोळ्याची गोदामे नष्ट करण्यात आली. या हल्ल्यानंतर या ठिकाणी मोठे स्फोट झाले. त्यातूनच या ठिकाणी दारुगोळ्याचा साठा होता, हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या अफगाण तालिबान राजवटीशी संबंधित नानगरहारमधील अन्य चार लष्करी ठिकाणांना देखील लक्ष्य करण्यात आले. तेथील मदत साहित्य, दारुगोळा आणि तांत्रिक पायाभूत सुविधा देखील नष्ट करण्यात आल्या, असा दावाही तरार यांनी केला. पाकिस्तानच्या कारवाईमध्ये आतापर्यंत ६८४ अफगाण तालिबान दहशतवादी ठार झाले असून ९१२ जण जखमी झाले आहेत. तालिबानींच्या २५२ चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. तर ४४ चौक्या ताब्यात घेऊन नंतर नष्ट करण्यात आल्या. तालिबान राजवटीचे २२९ रणगाडे, चिलखती वाहने आणि तोफा नष्ट करण्यात आल्या आहेत. अफगाणिस्तानमधील जवळपास ७३ दहशतवादी आणि त्यांच्या साहाय्यासाठीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असल्याचेही तरार यांनी म्हटले आहे. दुसरीकडे नानगरहार प्रांतात तालिबानच्या ४ ठिकाणांवर हल्ले केले गेले. जिथून ड्रोन पाठवले जात होते ते मुख्यालय असलेल्या ड्रोन कार्यशाळा आणि शस्त्रसाठा देखील नष्ट करण्यात आला. काबूल आणि नानगरहारमध्ये मिळून ६ ठिकाणी हल्ले केले गेले. यात अनेक दहशतवादीही मारले गेले आहेत. खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या कुर्रम भागातल्या सशस्त्र दलांनी अफगाण तालिबानच्या काही महत्वाच्या अड्ड्यांवर कारवाई केली. यात काही दहशतवादी मारले गेले. तर उर्वरित पळून गेल्याचे सुरक्षा सूत्रांनी म्हटले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाक-अफगाण सीमेजवळ अफगाण तालिबानच्या चौक्याही गायडेड क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त केल्या गेल्या, असेही सुरक्षा सूत्रांनी म्हटले आहे. पाकिस्तानकडून पुनर्वसन रुग्णालयावर हल्ला – तालिबानचा दावा मात्र सोमवारी रात्री पाकिस्तानने काबूलमधील सन रुग्णालयावर हल्ला केला होता. यात किमान ४०० जण ठार झाले आणि अन्य २५० जण जखमी झाले, असे अफगाण तालिबानच्या सरकारचा उपप्रवक्ता हमदुल्ला फितरतने सांगितले. या हल्ल्यामुळे रुग्णालयाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आणि बचाव पथके ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्याने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अजूनही किमान ५० जणांचे मृतदेह ढिगाऱ्यांखाली अडकले आहेत. बचाव आणि मदत कार्य सुरू आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या हवाई हल्ल्यामुळे पुनर्वसन रुग्णालयाच्या इमारतीचे पाच भाग उद्ध्वस्त झाले आहेत. तेथे किमान ३ हजार रुग्णांवर उपचार सुरू होते, असेही या वृत्तात म्हटले आहे. अफगाणिंना मारण्याचाच प्रकल्प – तालिबान या हल्ल्यानंतर तालिबान प्रशासनातील उपगृहमंत्री मुहम्मद नबी ओमारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. पाकिस्तानने अफगाणिंना ठार मारण्याचा प्रकल्पच हाती घेतला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अफगाणिस्तान पाकिस्तानच्या या आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर देईल, असे अफगाण सरकारचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिदने म्हटले आहे. जगाला मूर्ख बनवता येणार नाही – पाकिस्तान पाकिस्तानने दहशतवाद्यांविरुद्धच कारवाई केली आहे. अफगाण तालिबानकडून दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात आहेत. अफगाण तालिबानींकडून दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या उद्योगाद्वारे अफगाणी जनतेला आणि जगाला मूर्ख बनवता येणार नाही, असे पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी म्हटले आहे.