Pune : अजितदादांच्या पुण्यातच का या सगळ्या गोष्टी: राऊतांचा सवाल, म्हणाले निवडणुकीत गुंडांनी भाजप आणि राष्ट्रवादीला…

पुणेः स्वारगेट प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी मध्यरात्री १ वाजता शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून बेड्या ठोकल्या. या घटनेतील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्ंयासाठी चौथा दिवस उजाडावा लागला. या खळबळजनक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला आहे. राज्यभरातून या घटनेचा निषेध नोंदवत संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातच काल स्वारगेट बस स्थानकाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी तरुणीने आरडाओरड, विरोध केलाच नाही म्हणून आरोपीला गुन्हा करता आला, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
आरोपीला पकडून सरकारने उपकार केले का? गृह राज्यमंत्री दिव्य आहेत. शांतपणे बलात्कार पार पडला त्यामुळे बाहेर ज्यांना समजलं नाही, त्यांचं म्हणणं आहे तीने स्ट्रगल केले नाही, त्यांच्या या विधानाला राऊत यांनी खोडून काढले. तसेच पुण्याचे पालकमंत्री अजितदादा यांच्या पुण्यातच का या सगळ्या गोष्टी घडत आहेत, असा सवाल उपस्थित करत राजकीय वरदहस्त लाभलेले अनेक गुन्हेगार आहेत, असे राऊत म्हणाले.
गुंडांनी निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीला मदत केली
पुण्यातील गुंडांची ओळख परेड पोलीस आयुक्तांनी काढली होती. इतका मोठा इव्हेंट केला होता. ते सगळे गुंड भारतीय जनता पक्षाच्या आणि अजित पवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय होते. तेव्हा त्यांची ओळख परेड आणि धिंड का काढली नाही, असा सवाल त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना केला आहे. तर ज्या गुंडांची पुण्यामध्ये ओळख परेड पार पडली. याच गुंडांनी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप राऊतांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला आहे.
नेमकं काय म्हणाले होते योगेश कदम?
काल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानकाला भेट दिली. यानंतर त्यांनी पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा तपशील जाणून घेतला. परवा स्वारगेट एसटी स्टँडवर जी घटना घडली, त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुल कृती झाली नाही. ही घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 लोक होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कोणालाही शंका आली नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे विजय वडट्टीवार यांनी देखील त्यांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला आहे.





