बीड : बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अमानुष छळाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हाच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आजारी असल्याचे कारण देत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता कोण मंत्री होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहील आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील चौघांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. या चौघांपैकी एकाची वर्णी धनंजय मुंडेच्या जागी लागणार असंल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडबरोबर जवळीक असल्याने धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागाला आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याऐवजी आता पक्षाकडून कोणाला मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार? अशी चर्चा सुरु झाली आहे. ‘ही’ नावे चर्चेत दरम्यान, अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आल्याने त्यांच्या जागी अजित पवारांच्या पक्षातील नेत्याची वर्णी लागणार का? हे पाहून महत्वाचं ठरणार आहे. असं असताना अजित पवारांच्या पक्षातील चार नेत्यांची नावं मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आघाडीवर आहेत. यामध्ये छगन भुजबळ यांचं नावही चर्चेत आहे. छगन भुजबळ यांची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री होण्याची शक्यता असून मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे भुजबळ यांच्या पुन्हा मंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छगन भुजबळांबरोबरच अजित पवारांच्या पक्षातील अनिल पाटील यांचं नावही धनंजय मुंडेंची रिप्लेसमेंट म्हणून चर्चेत आहे. तसेच आमदार प्रकाश सोळंके, आमदार संजय बनसोडे यांचं नावं देखील चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांना अटक करण्यात आली आहे. त्य़ामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह भाजप आमदार सुरेश धस यांनी लावून धरली होती. त्यातच संतोष देशमुख यांना केलेल्या मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी आज बीड बंदची हाक दिली होती. या प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अखेर मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य़ाकडे दिला.